घरदेश-विदेशअभिनंदन आज पाकमधून परतणार

अभिनंदन आज पाकमधून परतणार

Subscribe

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सोडण्यासाठी पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करणार नाही. पाकिस्तानने आमच्या पायलटला सुखरुप भारतात पाठवावे. तसे केले नाहीतर आमचे मार्ग मोकळे आहेत, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला होता. तसेच कुटनितीचा वापर करत भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवला. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने अभिनंदन यांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला असून ते शुक्रवारी भारतात परतणार असल्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

भारतात घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांचा पाठलाग करताना भारताचे लढाऊ विमान मिग-२१ चे इंजिन खराब होऊन ते पाकिस्तानमध्ये कोसळले. विमानाचे पायलट अभिनंदन वर्थमान यांनी पॅराशूटमधून बाहेर उडी मारली. मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांना पाकिस्तानच्या फौजांनी तातडीने अटक केली. त्यांना मारहाणही झाली.

- Advertisement -

भारतीय पायलट ताब्यात असल्याचा गैरफायदा पाकिस्तान घेऊ इच्छित होता. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या सुटकेसाठी भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करावी, अशी मागणी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मोहम्मद कुरेशी यांनी केली होती. वर्थमान यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यास पाकिस्तान तयार आहे, असे कुरेशी यांनी सांगितले होते. मात्र, पाकिस्तान अभिनंदन वर्थमान यांच्या अटकेचा गैरफायदा घेत असल्याचे समजताच भारताने पाकिस्तानला इशारा दिला.

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने तातडीने भारतामध्ये पाठवावे. अभिनंदन प्रकरणावरून कोणतीही देवाणघेवाण केली जाणार नाही. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होईल आणि चर्चेचा पत्ता आपल्या हातात आहे असं पाकिस्तानला वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक दिली जावी अशी अपेक्षा असल्याचे भारताने पाकिस्तानला स्पष्ट केले होते. तसेच अभिनंदन यांची सुटका झाली नाहीतर आमचे मार्ग मोकळे आहेत, असेही भारताने पाकिस्तानला सुनावले होते.

- Advertisement -

इम्रान खान यांची पाक संसदेत माहिती
भारताच्या या इशार्‍यामुळे अखेरीस पाकिस्तानला नमते घ्यावे लागले. अभिनंदन वर्थमान यांची शुक्रवारी सुटका करण्यात येईल, अशी माहिती खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत दिली. इतकेच नव्हेतर शुक्रवारी अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्या शुक्रवारी अभिनंदन वर्थमान भारतात परततील अशी आशा आहे.

अभिनंदनचे असेही शौर्य,महत्त्वाची कागदपत्रे गिळली, काही पाण्यात भिजवून नष्ट केली

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे खरंच भारताचे अभिनंदन ठरले. पराशूटमधून उडी मारल्यानंतर आपण पाकिस्तानच्या लष्कराकडून पकडले जाणार हे कळताच त्यांनी एका तळ्यात उडी मारली. आपल्याकडील महत्त्वाची काही कागदपत्रे त्यांनी गिळून टाकली तर काही पाण्यात भिजवून नष्ट केली. पाकिस्तानच्या ताब्यात ही कागदपत्रे मिळू नयेत म्हणून अभिनंदन यांनी आपला जीव धोक्यात टाकून दाखवलेल्या या शौर्याची देशात प्रशंसा होत आहे.

विंग कमांडर अभिनंदन पॅराशूटमधून जेव्हा पाकव्याप्त भागातील जमिनीवर उतरले, त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना घेरलं. तेव्हा त्यांनी त्या लोकांना विचारले की, मी भारतात आहे काय ? तेव्हा स्थानिक नागरिकांनी तुम्ही भारतात असल्याचे सांगत त्यांना गावात घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर अभिनंदन यांना लागलीच समजले की ते

तेव्हा त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला आणि ते नियंत्रण रेषेच्या दिशेने ते धावत सुटले. त्यांना पकडण्यासाठी गावातील लोकही त्यांच्या मागे धावू लागली. मात्र आपण नियंत्रण रेषा ओलांडून भारतात जाऊ शकणार नाही, हे समजताच त्यांनी धावत जाऊन एका तलावात उडी मारली. तसेच आपल्याकडील काही कागदपत्रे त्यांनी तोंडात टाकून गिळून टाकली. तर काही कागदपत्रे पाण्यात बुडवून नष्ट केली. गावकर्‍यांनी अभिनंदन यांना मारहाण केली. त्यानंतर त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचे जवान पोहोचले आणि त्यांनी अभिनंदन यांना भीमबर आर्मीच्या एका कॅम्पमध्ये नेले.

अभिनंदन यांना ताब्यात घेताच पाकिस्तानने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्याकडून भारताच्या पुढील योजना, रणनीती याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मारहाण होऊनही अभिनंदन यांनी कोणतीही गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली नाही. ’माझे नाव विंग कमांडर अभिनंदन आहे. माझा सर्व्हिस नंबर 27981 आहे. मी फ्लाईंग पायलट असून हिंदू आहे,’ इतकीच जुजबी माहिती त्यांनी दिली होती. या व्हिडीओत अभिनंदन यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत होती. अभिनंदन यांच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर येताच भारताने पाकिस्तानला संपर्क केला आणि त्यांच्या सुखरुप सुटकेची मागणी केली. युद्धकैदीला मारहाण करून पाकिस्तान जिनिव्हा कराराचा भंग करत असल्याचा आरोप भारताने केला होता. यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये अभिनंदन चहा पित असताना दिसत होते.

माझ्या मुलाबद्दल मला अभिमान –वडील सिमहाकुट्टी यांचे भावोद्गार

My son will come back, Abhinandan Varthaman father wrote emotional letter
सिमहाकुट्टी
माझ्या मुलाबद्दल मला अभिमान आहे. तो खरा जवान आहे, असे पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे वडील निवृत्त एअर मार्शल सिमहाकुट्टी वर्थमान यांनी म्हटले आहे. भारताच्या दबावामुळे पाकिस्तान अभिनंदन यांना सोडण्यास तयार झाल्यामुळे सिमहाकुट्टी यांनी आनंद व्यक्त करत देशवासीयांचे आभार मानले आहेत.

एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता, तो पूर्ण झाला

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक भाष्य केले. एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. तो पूर्ण झाला, असे मोदी म्हणाले.
येथील विज्ञान भवनात आयोजित शांती स्वरुप भटनागर पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले की, एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. तो पूर्ण झाला. आता फक्त प्रॅक्टिस सुरू आहे. खरे काम नंतर करायचे आहे, असे मोदींनी अभिनंदन यांच्या सुटकेवर भाष्य करत पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदींचं भाषण सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका होणार असल्याचे वृत्त आले.

’भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत,’ अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केली.

दहशतवादाविरोधात चीन, रशिया भारतासोबत

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केवळ एअर स्ट्राईककरून पाकिस्तानला जेरीस आणले नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरातून त्याच्यावर दबावही आणला. दहशतवादाची उगमस्थळांचे निर्मूलन करण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर चीन आणि रशियाने बुधवारी सहमती दर्शवली.

भारत, रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक चीनमधील वुझेन येथे बुधवारी झाली. या वेळी दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्यावर या देशांनी एकमत व्यक्त केले. ’सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यावर आमचे एकमत झाले आहे. विशेषत: दहशतवाद आणि मूलतत्त्ववादाची उगमस्थळे नष्ट करण्यावर सहमती झाली आहे

असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या बैठकीनंतर सांगितले. मात्र, चीन पाकिस्तानचा जवळचा सहकारी आहे. त्यामुळे चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी सावधपणे वक्तव्य करताना पाकिस्तानही दहशतवादाच्या विरोधात असल्याचे या वेळी सांगितले.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, तसेच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव यांनी या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी वांग बोलत होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा मित्र म्हणून चीन विधायक भूमिका निभावत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तिन्ही देशांच्या पररराष्ट्रमंत्र्यांची १६वी बैठक झाली. तिन्ही देशांनी दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाविरोधातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याचे आवाहनही तिन्ही देशांनी जागतिक समुदायाला केले. मूलतत्त्ववादी गटांना पाठिंबा द्यायला नको, तसेच दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यार्‍यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही तिन्ही मंत्र्यांनी सांगितले.

भारत-पाक तणाव निवळण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करणार

भारताच्या आंतरराष्ट्रीय कुटनितीला मोठे यश येत असताना दहशतवादाचा पुरस्कर्ता पाकिस्तान एकाकी पडत आहे. भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला अनेक मोठ्या देशांनी पाठिंबा दिला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, असा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दिला आहे.

तर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव निवळण्यासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करणार आहेत.
पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, अशी रोखठोक भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी घेतली आहे. त्यानंतर, बुधवारी रात्री उशिरा अजित डोवाल यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी रहात असताना पाकिस्तानची मात्र कोंडी झाली आहे. भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला अनेक मोठ्या देशांनी पाठिंबा दिला आहे.

जैश-ए-मोहम्मद आणि त्याचा म्होरक्या मसूद अझहर याला काळ्या यादीत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणला जाणार आहे. ही पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा. वास्तविक, या बड्या देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. परंतु अमेरिकेसह रशिया, जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलिया यांसारखे बलाढ्य देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे.

तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानदरम्यान वाढता तणाव निवळण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण लवकरच संपुष्टात आले पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की दोन्ही देशांमधील तणाव लवकरच निवळेल, अनेक वर्षांपासूनचा असलेला हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर हल्ले सुरूच राहाणार !

पाकने दोन दिवसात ३५ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

एफ-१६ विमानाबाबतचा पाकिस्तानचा दावा खोटा

आमची लढाई दहशतवादाविरुद्ध असून जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कार करत राहिल तोपर्यंत दहशतवाद्यांच्या तळांवर भारत हल्ले करणार, असा ठाम निर्धार व्यक्त करत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानला तंबी दिली. तसेच बालाकोट येथील एअर स्ट्राइकमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, भारत सरकार जेव्हा ठरवेल तेव्हा ते उघड केले जातील, असेही सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत गेल्या तीन दिवसांपासून भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींची तपशीलवार माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर, मेजर जनरल सुरेंद्रसिंह महल आणि नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल डी. एस. गुजराल उपस्थित होते. यावेळी महल म्हणाले की, १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतीही वाढल्या आहेत.

गेल्या १४ दिवसांत पाकिस्तानी सैन्याने ३५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मात्र भारताने पाकिस्तानला त्यांच्या भाषेतच उत्तर दिले. जोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरू राहतील तोपर्यंत दहशतवाद्यांच्या तळावर भारत हल्ले करणार. या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कांगाव्याची पद्धतशीर चिरफाड केली. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत, एफ-16 विमानाचा वापर झालेलाच नाही, असे विविध दावे पाकिस्तानकडून करण्यात आले होते. हे सर्व दावे भारतीय हवाई दलानं खोडून काढले. ’प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचे विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तानने एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होता,’ असे हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. एफ-16 विमानांची हालचाल दिसताच हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. हे विमान अनेक ठिकाणी दिसलं. मिग-27, मिराज 2000, सुखोई विमानांनी एफ-16 च्या हालचाली टिपल्या. एफ-16 ने भारतीय लष्करी तळांना विशेषत: विविध लष्करी मुख्यालयांना लक्ष्य करून बॉम्ब टाकले. मात्र ते आसपास पडल्याने त्यामुळे कोणतीही विशेष हानी झाली नाही. हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत एफ-16 पाडलं. मिग 27 विमानानं एफ-16 जमीनदोस्त केले,’ अशी माहिती कपूर यांनी दिली. यावेळी कपूर यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -