घरमहाराष्ट्रलसीकरणात परप्रांतीयांची घुसखोरी

लसीकरणात परप्रांतीयांची घुसखोरी

Subscribe

महसूलमंत्री बाळासाहेबथोरात यांचा गौप्यस्फोट

लसीकरणाच्या गोंधळात कोविन अ‍ॅपने भर घातली असून परराज्यातील लोकही कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी करून राज्यात लसीकरणासाठी येत आहेत, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथे केला. लसीचा तुटवडा, केंद्राचा नियोजनशून्य कारभार, राज्य सरकारांना असहकार्य करण्याच्या भूमिकेमुळे देशभरात लसीकरण मोहिमेचा पुरता बोजवारा उडाल्याची टीकाही त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

लसीसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या कोविन अ‍ॅपवर नोंदणी करावी लागते. परंतु या अ‍ॅपमुळे मोठा गोंधळ होत आहे. कोणीही, कोणत्याही केंद्रावर नाव नोंदवून लस घेऊ शकतो. नगर जिल्ह्यातील घुलेवाडी केंद्राला ४०० डोस प्राप्त झाले होते. या केंद्रावर लस घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून १८० लोक आले. यात नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यातील लोक होते; पण विशेष म्हणजे हैद्राबादमधूनही काही लोक आले होते, अशी माहिती थोरात यांनी दिली.

- Advertisement -

लसीसाठी लोक जीवाचे रान करत आहेत. असे प्रकार इतर केंद्रावरही होत असतील. महाराष्ट्र सरकारने लसीकरणासाठी राज्य सरकारच्या स्वतंत्र अ‍ॅपला परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा विनंती करूनही केंद्र सरकारकडून यावर अद्याप सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, याकडे थोरात यांनी लक्ष वेधले.

कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नाही. त्यासाठी कोणतेही नियोजन केलेले दिसत नाही. केंद्र सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून टास्क फोर्स नेमला. तरीही केंद्र सरकार काही जागे झाले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर दुसर्‍या लाटेचा संभाव्य धोका ओळखून काही नियोजन करणे अपेक्षित असताना केंद्र सरकारने त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिला जात आहे. आतातरी केंद्राने जागे व्हावे आणि लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

- Advertisement -

सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार

देशभर लसीकरण मोहिमेत गोंधळ कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलेच आहे. आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे देशातील लसीकरण मोहिमेचाही बोजवारा उडाला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली; पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात लस दिली नाही. कोरोना प्रतिबंधक लसींचा सर्वात मोठा उत्पादक असणार्‍या भारतामध्ये लस पुरवठ्याअभावी लसीकरण केंद्रे बंद आहेत, याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप थोरात यांनी केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -