घरमहाराष्ट्रशिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम, मुंबई मनपातील सर्व पक्षांची कार्यालये सील

शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम, मुंबई मनपातील सर्व पक्षांची कार्यालये सील

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील दोन्ही गटांमधील तेढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार, माजी नगरसेवक, माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवारी एकमेकांना भिडले. पालिका मुख्यालयातच हा तणाव निर्माण झाल्याने पालिकेतील सर्वक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिवसेनेची कार्यालये, शाखा ताब्यात घेण्यावरून राज्यात विशेषतः ठाणे, कल्याण, डोंबिवलीनंतर आता मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार, माजी नगरसेवक, माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवारी एकमेकांना भिडले. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. शाब्दिक चकमकही झाली. त्यामुळे पक्ष कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचण्यापूर्वी स्थानिक पोलीस व पालिका सुरक्षारक्षक यांनी प्रथम मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर दोन्ही गटाला धक्काबुक्की करीत कार्यालयाबाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

- Advertisement -

मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने आजी नगरसेवक माजी नगरसेवक झाले. मात्र निवडणूक होईपर्यंत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांना व गटनेते आदींना पक्ष कार्यालय वापरता यावे, यासाठी खुले ठेवले होते. येथील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेणे सुरू करण्यात आले. माजी नगरसेवक दररोज या पक्ष कार्यालयात येऊन बसू लागले व चर्चा वगैरे करू लागले. हे सर्व सुरू असतानाच बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, उपनेते यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदींनी मुंबईतील विकासकामांच्या निमित्ताने पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांनी पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात जाऊन ठाण मांडले. त्यावेळी पक्ष कार्यालयात फक्त कर्मचारी वगळता उद्धव ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. मात्र या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सदानंद परब आदींनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर तिथे वादाला तोंड फुटले.

या सर्व प्रकारानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सर्व पक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या राड्यात भाजप, समाजवादी राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेस या सर्वच पक्षांना मोठा व नाहक फटका बसला आहे. आता मुंबई मनपाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कदाचित ही कार्यालये खुली करण्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -