घरमहाराष्ट्रIrshalwadi landslide : इर्शाळवाडी येथे बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा रवाना

Irshalwadi landslide : इर्शाळवाडी येथे बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा रवाना

Subscribe

Irshalwadi landslide :  रायगड जिल्हा, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या दुर्गम खेडेगावात मध्यरात्रीच्या सुमारास गावकरी साखरझोपेत असताना काही घरांच्या वस्तीवर मोठी दरड कोसळली. सदर दुर्दैवी घटनेत काही जणांचे बळी गेले, तर अनेकजणांना वाचविण्यात यश आले आहे. या ठिकाणी बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेकडून आवश्यक यंत्रणा रवाना करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Irshalwadi landslide Mumbai Municipal Corporation has been dispatched for rescue operations at Irshalwadi)

इर्शाळवाडी हे खेडेगाव असल्याने वाहनाची ये-जा करण्यासाठी नीट रस्ते नाहीत. त्या ठिकाणी चालत जाऊन यंत्रणेशिवाय म्हणजे हाताने मदत व बचावकार्य सुरू आहे. त्यातच पावसाचा मारा सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. याठिकाणी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने बचावकार्य वेगाने होण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत घटनास्थळी तीन बॉब कॅट संयंत्र, पोकलेन संयंत्र, तीन वाहने आणि आवश्यक मनुष्यबळ आजच्या आज पाठविण्यात आले आहे. त्यामुळे बचावकार्य व मदतकार्य जलदगतीने होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ढीगाऱ्याखालून 103 जणांना बाहेर काढले, 12 मृत… मुख्यमंत्री होते तळ ठोकून

इर्शाळवाडी येथील दरड कोसळण्याची दुर्घटना पाहता मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सदर घटनास्थळी मदतीसाठी आवश्यक ती यंत्रणा पाठविण्याबाबत पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांना आदेश दिले. त्यानुसार, आयुक्त चहल व अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार घटनास्थळी बचावकार्यासाठी तीन बॉब कॅट संयंत्र घन कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक याप्रमाणे ही तीन वाहने रवाना झाली आहेत. तसेच, पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Irshalwadi landslide : राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच इर्शाळवाडीबाबत केलेले विधान खरं ठरलं

इर्शाळवाडी संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते

रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना काल (19 जुलै) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गावातली अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबीसारख्या मशीन घटनास्थळी पोहोचविण्यासाठी अडथळे येत आहेत. दोन हेलिकॉप्टरही रेक्स्यू ऑपरेशनसाठी तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे ते अजूनही उड्डाण करू शकले नाहीत. इर्शाळवाडीमध्ये एकूण 48 कुटुंब राहत असून तेथील लोकसंख्या 228 एवढी आहे. मात्र अनेक लोक नोकरीच्या कामानिमित्त बाहेर गावी जात असतात, त्यामुळे ही दुर्घटना घडली त्यावेळी वाडीत नक्की किती लोक होती हे समजू शकलेले नाही. मुख्य म्हणजे इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -