देशात चित्ते आल्याने लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? अजित पवारांचा केंद्राला सवाल

मुंबई – तुमच्या – माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हेही ठीक आहे. परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे ते सांगा. तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी अजून किती लाख कोटीची गुंतवणूक येणार हे सांगा असा रोखठोक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रसरकारला केला.

जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रसरकार, राज्यसरकारवर हल्लाबोल केलाच शिवाय राजकारणात होणाऱ्या वैयक्तिक टिकेवर नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. वेदांतासारख्या प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी या चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. मात्र त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये असेही अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

वेदांताचा जो फॉक्सकॉन प्रकल्प होता त्याबद्दल चर्चा बरीच झाली. आता मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. त्यांनी याचा पाठपुरावा करावा तो त्यांचा अधिकार आहे. बेरोजगारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावावे असे सांगतानाच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा प्रयत्न सुरू होता. मात्र काही पक्षातील लोक वेगळया मागण्या किंवा डिमांड केली होती, म्हणून प्रकल्प गेला असे स्टेटमेंट करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असं अजिबात झालेले नाही कारण नसताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. जर कुणाला वाटत असेल तर केंद्रसरकार, राज्यसरकार, एजन्सी तुमच्या हातात आहेत. तर चौकशी करावी पण स्टेटमेंट करुन बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करु नये. वास्तविक असं काही घडलेले नाही तरीपण चौकशी करायची असेल तर जरुर करा ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या असे थेट आव्हानच अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिले.

काही जण अफवा पसरवत आहेत. चुकीच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहेत की, वेदांताला नाकारलं हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

काहीजण बोलत आहेत की, अजून प्रकल्प आणणार आहे तर पुन्हा महाराष्ट्राला सांगतो महाराष्ट्राच्या हिताचे जे – जे प्रकल्प असतील ते – ते प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावेत फक्त त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये ही बाब सरकारने लक्षात ठेवावी आणि त्याची नोंद घेतली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीचे पैसे नुकसानग्रस्तांना मिळालेले नाही. अजून काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. याबाबत सरकारने नवीन सूचना दिल्या पाहिजेत. एनडीआरएफचे निकषाप्रमाणे जास्तीचा पाऊस पडल्यानंतर जी काही मदत करायला हवी किंवा अधिवेशनामध्ये सरकारने जी काही मदत जाहीर केली होती. त्याअनुषंगाने पुढच्या मदती जाहीर केल्या पाहिजेत. परंतु त्या होत नाही ही शेतकऱ्यांची खंत आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

काल ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. टिव्ही चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. की अमुक पक्षाला सर्वाधिक जागा वगैरे परंतु या ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत हे त्रिवार सत्य आहे. एकंदरीतच जे आकडे दाखवले जात आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे यातून सर्वांनीच बोध घ्यायला हवा. ही निवडणुकीची रंगीत तालीम आहे असे स्पष्ट करतानाच या निवडणुकीत राष्ट्रवादी विचाराचे जे लोक निवडून आले आहेत त्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

एसटीला १४०० कोटींची तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली होती, असे सांगताना अजित पवार यांनी एसटीचे पगार साडेतीनशे कोटीवर जातात. मधल्या काळात जो काही संप झाला होता त्यानंतर एसटी सुरू झाल्या आहेत. एसटीची त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून पगार होतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. अर्थसंकल्पात पैसे कमी पडतील ते राज्यसरकार तिजोरीतून देईल असे जाहीर करण्यात आले होते. आताच्या पुरवण्या मागण्यातदेखील हजार कोटीची अधिकची तरतूद शिंदेसरकारने दाखवली होती. म्हणजे २४०० कोटीचा निधी आणि कमी पडले तर नागपूरच्या अधिवेशनाला ते दाखवू शकतात त्यामुळे पैसे जास्त झाले की कमी झाले याला महत्व देऊ नका एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत याबद्दल सरकारने बारकाईने लक्ष द्यावे अशी सूचनाही अजित पवार यांनी सरकारला केली.

दसरा मेळाव्यासाठी अजूनही उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. वास्तविक शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झाला आणि त्यानंतर बाळासाहेबांनी ती जबाबदारी दसरा मेळाव्यातच उध्दव ठाकरे यांच्यावर पक्षप्रमुख म्हणून सोपवली होती. शिवसेनेचं नेतृत्व उध्दव ठाकरे हे करतील असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. आता बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाला मेळावा घ्यायला परवानगी मिळाली आहे तर शिवाजी पार्कवर उध्दव ठाकरे यांना परवानगी द्यायला हवी. दोन्ही मेळावे व्हावेत आणि दोघांचे विचार राज्याने ऐकावे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेतच असे पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केलेच शिवाय जसं आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतो. गांधी नेहरुंचे नाव कॉंग्रेस घेते. जे आहे ते आहे. जी पुण्याई आहे ती घेतली. आपल्या वडिलांचे, आपल्या पूर्वजांचे नाव घेतो ना. ही परंपरा आज नाही. देशात ही पहिल्यापासून आहे आणि ती पुढे चालतच राहणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

‘निंदकाचं घर असावं शेजारी’ ते निंदकाचं घर आहे. जी काही निंदा करायची असेल ती करु द्या. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही लोकांच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या राष्ट्रीय नेत्यांची शिकवण आहे. आमच्यापरीने आम्ही काम करत राहणार. जनतेला जे योग्य वाटेल तर ती त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. उदाहरणार्थ एकेकाळी दोन खासदार निवडून आलेला पक्षदेखील वर जाऊ शकतो हे निंदकांनी लक्षात ठेवावे असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

जिथे प्रकल्प उभा राहणार आहे तेथील लोकांचा पाठिंबा असणे महत्वाचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल तर बहुमताचा आदर केला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. वेगळ्या विदर्भाबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याला तुम्ही महत्त्व देऊ नका. जोपर्यंत स्थानिक जनता वेगळ्या विदर्भासाठी पाठिशी उभी राहत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. कितीही आले आणि कितीही गेले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असेही अजित पवार यांनी वेगळया विदर्भातील प्रश्नावर बोलताना सांगितले.