Terrorist Attack : जान मोहम्मद डी गॅंग कनेक्शनमुळेच २० वर्षांपासून रडारवर- महाराष्ट्र ATS

vineet agrawal

दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईतील धारावीतील राहणारा होता. जान मोहम्मद शेख या संशयित आरोपीचे वीस वर्षापूर्वी दाऊद गॅंगशी संबंध होते. या व्यक्तीवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नजर ठेवली होती, अशी माहिती दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिली. दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कारवाईनंतर आता महाराष्ट्र एटीएस पोलिस हे आज बुधवारी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांसोबत माझे बोलणे झाले असून या प्रकरणात महाराष्ट्र एटीएस आता जान मोहम्मद शेखची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालियाची चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. (Jan Mohammad was working and on radar of maharashtra ATS say vineet agrawal)

 

डी गॅंगसाटी केले काम

याआधी वीस वर्षांपूर्वी जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालियाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसाठी काम केले आहे. वीस वर्षांपूर्वी दाऊदच्या संपर्कात आल्यानेच डी कंपनीच्या लिंकमुळेच ही व्यक्ती महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर होती असेही विनित अग्रवाल यांनी स्पष्ट केले. डी गॅंगसाठी सीमापार कारवायांसाठीचा हस्तक म्हणून जान मोहम्मद काम करत असे. सध्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडे कोणतीही स्फोटके किंवा हत्यार सापडले नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

आर्थिक चणचण भासली अन्…

जान मोहम्मद शेखने निजामुद्दीनला जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. पण हे तिकिट कन्फर्म न झाल्यानेच दोन दिवसांनंतर स्लीपर कोचने जान मोहम्मदने निजामुद्दीनसाठी प्रवास केला. मुंबई सेंट्रलपासून जान मोहम्मदने प्रवास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतून निघालेल्या जान मोहम्मदला राजस्थानमधून अटक केली. जान मोहम्मद हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानंतर जान मोहम्मदने टॅक्सी खरेदी केली होती. पण हप्ते न भरल्यानेच त्याची टॅक्सी नेण्यात आली होती. त्यानंतर एक टू व्हीलरही खरेदी केली होती. पण आर्थिक अडचणीमुळे जान मोहम्मदला संपर्क करण्यात आल्याची शक्यता अग्रवाल यांनी व्यक्ती केली. आर्थिक चणचणीमुळेच जान मोहम्मदला संपर्क केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ATS चे अपयश नाहीच 

या संपुर्ण प्रकरणात महाराष्ट्र एटीएसचे अपयश मानत नाही, असेही त्यांनी सांगितले. जान मोहम्मद या व्यक्तीला मुंबई निजामुद्दीन प्रवासादरम्यान राजस्थानच्या कोटा येथून जान मोहम्मदला अटक करण्यात आली आहे. पण या संपुर्ण प्रकरणात एकही विस्फोटक किंवा हत्यारही सापडले नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचे अपयश मानत नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामध्ये इंटेलिजन्स एजन्सीकडून ही माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच वेगवेगळ्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी या संशयित दहशतवाद्यांना एकाचवेळी अटक केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाशी संबंधित बोलणे हे दिल्ली पोलिसांसोबत सुरू आहे. तसेच लवकरच या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून एफआयआर अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, मुंबई सुरक्षित

महाराष्ट्र राज्य आणि मुंबई शहर हे संपुर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही दहशतवादी कारवाईवर महाराष्ट्र एटीएसचे नियंत्रण असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या रडावर अनेक लोक हे दहशतवादी कारवायांच्या निमित्ताने असतात. पण या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वतंत्र होती. त्यावेळी महाराष्ट्र एटीएसला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दिल्लीमध्ये महाराष्ट्र एटीएसची एक टीम जाणार असून जान मोहम्मदची चौकशी करेल असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही अलर्टशिवाय दिल्ली पोलिसांनी ही कारवाई राजस्थानच्या कोटा येथे केली असेही त्यांनी स्पष्ट केले. जान मोहम्मदवर याआधी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये एक प्रकरण हे २०१० सालचे वीजचोरीचे आहे. तर एका प्रकरणात फायरिंगच्या प्रकरणात त्याच्याविरोधात केस आहे. सध्या न्यायालयात दोन प्रकरणेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई लोकलची माहिती चुकीची

मुंबई लोकल किंवा मुंबईतील ठिकाणे ही दहशतवाद्यांच्या रडारवर होती, ही माहिती पुर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत कोणतीही रेकी झाली नसल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मुंबईत कोणतीही स्फोटके किंवा हत्यार सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जान मोहम्मदच्या कुटूंबीयांना चौकशीसाठी संपर्क साधल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


हेही – Terrorist Attack: कोणी शेतकरी तर कोणी MBA होल्डर, वाचा दहशतवाद्यांची प्रोफाईल