घरमहाराष्ट्र'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट' वक्तव्यावर जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले...

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

Subscribe

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना जयंत पाटील यांनी मंगळवारी (२८ मार्च) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर त्यांनी आता खुलासा केला असून सुप्रीम कोर्टाने अपात्रता निकाल दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून राज्यातील सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना राज्यातील राजकारणाबाबत मोठा दावा करताना म्हटले होते की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. यावर त्यांनी आता खुलासा करताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचा निकाल दिल्यास शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. जर सरकार कोसळले तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका न लागता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

सरकार निवडणुकांना घाबरतो
राज्यातील सरकार मध्यावधी निवडणुका घाबरत असून स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका पुढे कशा जातील, याचाच प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा सहभाग नसतो कारण कार्यकर्ता ती निवडणूक लढत असतो; मात्र इतर निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यामुळे परिस्थितीनुरूप स्थानिक जिल्हाध्यक्षांना आणि नेत्यांना त्या संदर्भातील अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाकडून धार्मिक भावना भडकवण्याचे काम
महागाईमुळे जनता बेहाल असून गरीबांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे भाजपाकडून धार्मिक भावना भडकवण्याचे काम सुरू असून महागाईच्या प्रश्नावरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशात कोणत्या घोषणा द्याव्यात, काय बोलावे याचा निर्णय न्यायालयच घेत असल्यामुळे आता बोलण्याची देखील सोय राहिली नाही, अशा खोचक टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

- Advertisement -

महाविकास आघाडीची पहिली सभा
महाविकास आघाडीची मराठवाड्यात पहिल्यांदाच भव्य सभा येत्या २ एप्रिलला होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून फार मोठी सभा होईल याची मला खात्री आहे, असे जयंत पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनता अलिकडच्या काळात सभांना उत्सूर्फ प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सभा फार मोठी होईल. यानंतर आम्ही सर्व विभागात सभा घेणार आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -