घर महाराष्ट्र Jayant Patil : "दुष्काळ आपल्या दारी" म्हणत जयंत पाटील यांची सरकारवर सडकून...

Jayant Patil : “दुष्काळ आपल्या दारी” म्हणत जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

Subscribe

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. पण अपुऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यासाठी शासन नेमक्या कोणत्या उपाययोजना करत आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'दुष्काळ आपल्या दारी' म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात लावलेले हजेरी आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांची खरीपाची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या संकटाने डोके वर काढलेले आहे. परंतु सरकारकडून अद्यापही याबाबतची कोणतीही पाऊले उचलण्यात येत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. तर विरोधकांकडून दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचे काम सुरू आहे. (Jayant Patil criticizes the government by saying “drought is at our door”)

हेही वाचा – भर सभेत साधूचा फोन वाजताच वरुण गांधी म्हणाले, अरे अडवू नका…

- Advertisement -

सध्या राज्य सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा धडाका लावण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. पण अपुऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यासाठी शासन नेमक्या कोणत्या उपाययोजना करत आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘दुष्काळ आपल्या दारी’ म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबतचे ट्वीट जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आलेले आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

काय आहे जयंत पाटलांचे ट्वीट?

“सद्य:स्थितीत 329 महसुली मंडळात पावसाचा 23 दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास 70 टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे. खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? #दुष्काळ_जाहीर_करावा” असे ट्वीट करत पाटलांनी सरकारची कानउघडणी केली आहे.

- Advertisement -

पावसाने गेल्या महिन्याभरापासून दडी मारल्याने आता खरीपाची पिके ही धोक्यात आलेली आहेत. तर काही भागांतील पिके ही जळण्यास सुरुवात झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिके वाचविता यावी यासाठी शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. खरीपाच्या हंगामात पावसाची झालेली अवस्था पाहता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिके लावताना नीट विचार करावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील अनेक वाड्यांना, वस्त्यांना आणि गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

- Advertisment -