लोकशाहीला टिकवण्यासाठी विरोधी पक्ष टिकला पाहिजे; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

उस्मानाबाद येथे माजी आमदार भाई स्व. उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या सोहळ्याला उपस्थित होते. जयंत पाटलांनी संबोधित करताना म्हटलं की, दुर्दैवाने आता खोक्याच्या चर्चा आपल्याला ऐकू येत आहेत. म्हणून लोकशाहीला टिकवून ठेवणारा विरोधी पक्ष टिकून राहिलाच पाहिजे, ही काळाची गरज आहे, असं म्हणत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली.

कोणत्याही धनाची अपेक्षा न करता, आहे त्या परिस्थितीत सर्वसामान्यांसह राहून त्यांनी लोकांच्या प्रश्नांना बुलंद आवाज दिला. दुर्दैवाने आता खोक्याच्या चर्चा आपल्याला ऐकू येत आहेत. म्हणून लोकशाहीला टिकवून ठेवणारा विरोधी पक्ष टिकून राहिलाच पाहिजे, ही काळाची गरज आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

वादग्रस्त विधाने करून समाजमनाची चाचपणी काही जणांनी चालवली आहे. समाज किती चिडतो, किती संघटित आहे, किती ताकद आहे, कोणते घटक एकत्रित होतात. याचे सर्वेक्षण होत आहे. पत्रकारितेवर मर्यादा आणल्या गेल्या आहेत. या अविचारी प्रवृत्तींवर विजय मिळविण्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीने लढायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

त्याग, कणखरपणा आणि लोकांसाठी संघर्ष करणारे स्व. उद्धवराव पाटील यांसारखे नेते जुन्या पिढीने पाहिले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. आमदार असताना एसटीने प्रवास करणारे भाई सर्वांना ज्ञात आहेत, असंही पाटील म्हणाले.


हेही वाचा : बाप जैसा बेटा.., ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाची खैरेंवर टीका