शेकापचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

कंधार तालुक्यातील गऊळ गावी धोंडगे यांचा जन्म झाला. तेथून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु केली. दुर्लक्षित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. आमदार असताना धोंडगे आपल्या भाषणांनी विधिमंडळ सभागृह दणाणून सोडत होते. विविध प्रश्नांवरुन ते सरकारची कोंडी करायचे. सभागृहात सर्वात आधी येणारे व सर्वात शेवटी जाणारे सदस्य म्हणून त्यांची ओळख होती. 

नांदेडः मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. केशवराव धोंडगे यांचे रविवारी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. पाच वेळा आमदार तर एकदा खासदार अशी त्यांची राजकारणातील कारकिर्द आहे. विधान परिषदेतील त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत.

कंधार तालुक्यातील गऊळ गावी धोंडगे यांचा जन्म झाला. तेथून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु केली. दुर्लक्षित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. आमदार असताना धोंडगे आपल्या भाषणांनी विधिमंडळ सभागृह दणाणून सोडत होते. विविध प्रश्नांवरुन ते सरकारची कोंडी करायचे. सभागृहात सर्वात आधी येणारे व सर्वात शेवटी जाणारे सदस्य म्हणून त्यांची ओळख होती.

धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. सत्यागृह केले. आणिबाणीच्या विरोधातही त्यांनी लढा दिला. या लढ्यात ते १४ महिने कारागृहात होते. त्यांच्या सत्यागृहाची नावेही विशिष्ट होती. पिंडदान, बोंबल्या, शेणचारऊ, खईस कुत्री ही त्यांच्या सत्यागृहाची नावे कायम स्मरणात राहणारी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे काम त्यांनी सुरु केले. साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विचारांवर त्यांची निष्ठा होती.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दिचे ५० वर्षे पूर्ण केली, त्यावेळी त्यांचा नांदेड येथे सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमात धोंडगे यांनी शरद पवार यांचा मुक्का घेतला होता. त्यांचे अभिनंदन केले होते. मात्र भाषणात धोंडगे यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार हे बिना चीपड्याचे नारद आहेत. नारदही पवारांची बरोबरी करू शकत नाहीत. पवार कोणाच्या घरचा माणूस कसा फोडतील याची कुणकुण लागू देत नाहीत, अशा शब्दात धोंडगे यांनी पवार यांचा समाचार घेतला होता.

निर्भिड आणि स्पष्ट वक्ता म्हणून धोडगे यांची ख्याती होती. १९७५ साली आणिबाणीला विरोध करत तुरुंगवास भोगलेल्या धोंडगे यांनी १९७७ मध्ये नांदेड लोकसभा जिंकली होती. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.