पवारांचा गुगली फेल; लेटर बॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यास रिबेरो यांचा नकार

letter bomb Julio Ribeiro refuses to investigate the parambir singh letter case
पवारांचा गुगली फेल; लेटर बॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यास रिबेरो यांचा नकार

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर यांच्या लेटर बॉम्बने राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे निर्माते शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची चौकशी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत व्हावी असं म्हटलं होतं. यावर आता मुंबई, गुजरात आणि पंजाबचे माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव जर माझ्याकडे आला तर मी तो स्वाकारणार नाही, असं ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटलं आहे.

ज्यूलिओ रिबेरो यांनी एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारचं काम करण्याचं आता माझं वय राहिलेलं नाही आणि जरी मी ते काम करू शकत असेन तरी देखील मी ते काम स्वीकारणार नाही, असं रिबेरो म्हणाले. या प्रकरणात ज्या प्रकारे पैशांच्या व्यवहाराबाबत बोलले जात आहे, सचिन वाझेसारख्या एन्काउंटर स्पेशलिस्ट आपल्याला एखादं पद मिळवण्यासाठी कशा प्रकारची लॉबिंग करतो हे सगळं पाहून अशा प्रकारच्या प्रकरणात मी स्वत:ला जोडू इच्छित नाही, असं ज्यूलिओ रिबेरो म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांनी टाकलेला गुगली स्वत: ज्यूलिओ रिबेरो यांनी टोलावला आहे.

शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली तरी आपण हे काम स्वीकारणार नाही असं ठामपणे ज्यूलिओ रिबेरो यांनी सांगितलं. ही अतिशय अवघड अशी परिस्थिती आहे आणि ती कोणत्या दिशेला घेऊन जाईल याबाबत काही सांगता येत नाही. ज्या प्रकारे राजकारणाचा गोंधळ सुरू आहे त्याचा मला तिरस्कार आहे, असं ज्यूलिओ रिबेरो म्हणाले.


हेही वाचा – परमबीर विरोधकांची ‘डार्लिंग’, पण सरकार बहुमताचं; कुरघोडी कराल तर आग लागेल