Homeमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

Lok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्पात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून या पाचही जागांवर काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

या लोकसभा निवडणुकीत भाजपाची दमछाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना भाजपाला घाम फुटला आहे. काही ठिकाणी भाजपा दुसऱ्यांचे उमेदवार पळवत आहे, अशी टीका करतानाच, काही असे उमेदवार आहेत, ते इच्छुक नसतानाही त्यांना जबरदस्तीने तिकीट देण्यात आले आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तिकीट जाहीर होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी, आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असून लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे म्हटले होते.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेंकडून शब्द

उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव आधी चर्चेत होते. त्यानंतर खुद्द विजय वडेट्टीवार यांना तिकीट दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पक्षाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. त्यांनी तो घेतला असून तो आम्ही मान्य केला आहे.

राजू पारवे यांच्या टीकेवर पलटवार

आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत काल, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमधील हुकूमशाही आणि झुंडशाहीमुळे हा निर्णय घेतल्याचे पारवे यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना, सत्तेमुळे पारवे यांना शहाणपण सुचल्याचा पलटवार वडेट्टीवार यांनी केला आहे. आमदार होईपर्यंत त्यांना हुकूमशाही दिसली नाही. रामटेकमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना हुकूमशाही दिसली, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Politics: काँग्रेसला धक्का; आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकची जागा लढवणार