घरताज्या घडामोडीArchana Patil : भाजप आमदाराची पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; धाराशिव लोकसभा मतदारसंघातून...

Archana Patil : भाजप आमदाराची पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

Subscribe

मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या हातून लोकसभेची आणखी एक जागा निसटली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून (धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रवेशासोबतच पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात पुन्हा एकदा पाटील कुटुंबातील उमेदवार असणार आहे. गेल्या वेळी त्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता.

Archana Patil NCP Ajit Pawar Osmanabad Candidate
अर्चना पाटील यांनी सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला यावेळी औरंगाबाद शिक्षक मंतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि कार्यकर्ते उपस्थित होते 

भाजप आमदाराची पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

महायुतीमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आला आहे. वास्तविक येथे गेल्यावेळी शिवसेनेचा खासदार निवडून आला होता. धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. अर्चना पाटील यांनी 2012 पासून सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद गटातून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. 2017 मध्ये तेर जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवला होता. याच कार्यकाळात त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राहिल्या होत्या. तसेच शिक्षण, आरोग्य सभापती पदाचाही कार्यभार सांभाळला. लेडीज क्लबच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात महिलांसाठी काम केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha 2024: अजित, सुनेत्रा पवार हेच आमचं कुटुंब; सख्ख्या भावाने साथ सोडली पण हे नातेवाईक सोबत

सासरे होते राष्ट्रवादीतून खासदार

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2009 साली सर्वसाधारण झाला. त्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसने पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसने येथे पाटील घराण्यालाच उमेदवारी दिली आहे. हीच परंपरा अजित पवारांनीही कायम ठेवली आहे. पवार आणि पाटील कुटुंबाचे जवळचे नाते देखील आहे.

- Advertisement -

2014 साली पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला. अर्चना पाटील यांचे ते सासरे होते. शिवसेनेचे रवींद्र गायकवाड येथून विजयी झाले होते. 2019 मध्ये शिवसेनेने येथे नवीन आणि तरुण चेहरा दिला. ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांनी राणा जगजितसिंह यांचा 1,26,858 मतांनी पराभव केला होता. ओमराजे निंबाळकर आणि पाटील घराणे यांच्यात भाऊबंदकीचा वाद आहे. महायुतीतील जागा वाटपात हा मतदारसंघ आपल्याकडे राखत अजित पवारांनी पुन्हा एकदा पाटील घराण्यातच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : भिंवडीची जागा राष्ट्रवादी शरद पवारांनीच राखली; पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -