घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी महाभांडणाच्या दिशेने!

महाविकास आघाडी महाभांडणाच्या दिशेने!

Subscribe

-शरद पवारांचे पृथ्वीराज चव्हाण, राऊतांवर टीकास्त्र, - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पवारांना प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीला पर्याय असल्याचे सांगितले जात होते. उद्धव ठाकरेंना जनतेचा भावनिक पाठिंबा मिळत असताना आघाडीच्या वज्रमूठ सभांनाही प्रतिसाद मिळत होता, परंतु अचानक अजित पवार यांच्या कथित बंडाच्या चर्चा आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उपसलेल्या राजीनामास्त्रानंतर आघाडीतील विश्वासाची जागा संशयाने घेतली आहे. आघाडीतील नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप तीव्र होऊ लागले आहेत.

मंगळवारी शरद पवारांनी सातार्‍यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारले तर ते खासगीत सांगतो असे म्हणतील, असे पवार म्हणाले, तर राऊतांच्या बोलण्याकडे मी फारसे लक्ष देत नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी टोला लगावला. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लागलीच प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे भाजपविरोधात लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते आहेत, असे पटोले म्हणाले. या तू तू मैं मैंवरून सध्या महाआघाडी महाभांडणाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकात भाषण करताना मोठे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपबरोबर प्लॅन बी सुरू आहे. राष्ट्रवादी सध्या आमच्यासोबत असली तरी ते किती दिवस आमच्यासोबत असतील काही ठाऊक नाही. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सातत्याने बंद दाराआड बोलणी सुरू असल्याचा जळजळीत आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, तर सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करीत वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले, अशी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त करीत राऊतांना तिखट शब्दांत सुनावले.

त्यानंतर नेहमी प्रत्येकाच्या टीकेला, आरोपाला प्रत्युत्तर देणारे संजय राऊत माध्यमांसमोर दिसले नाहीत. त्यावर शरद पवार यांनी सातार्‍यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिले. यावेळी शरद पवार म्हणाले की, आम्ही कधी प्रसिद्धी करीत नाही. आम्ही पक्षात काय करतो ते राऊतांना माहिती नाही. पक्षात काय होते हा आमच्या घरातील प्रश्न आहे. सामनाच्या अग्रलेखातून राऊत काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेविषयी बोलताना त्यांच्या पक्षात त्यांचे काय स्थान आहे, ते ए आहेत, बी आहेत, सी आहेत की डी आहेत ते आधी तपासावे. त्यांच्या पक्षातील इतर सहकार्‍यांना विचारले की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीर सांगणार नाही, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

ते ए आहेत की बी हे त्यांचे सहकारी खासगीत सांगतील – पवार
सामनाच्या अग्रलेखातून राऊत काय लिहितात याला आम्ही महत्त्व देत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेविषयी बोलताना त्यांच्या पक्षात त्यांचे काय स्थान आहे, ते ए आहेत, बी आहेत, सी आहेत की डी आहेत ते आधी तपासावे. त्यांच्या पक्षातील इतर सहकारी तुम्हाला खासगीत सांगतील, असे शरद पवार म्हणाले.

कुणीही अपशकुन करू नये – पृथ्वीराज चव्हाण
मी बरेच काही सहन केले आहे. शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे. कुणी तरी मंत्री व्हावे, कुणाला तरी पद मिळावे यासाठी महाविकास आघाडी झालेली नाही. भाजपचा विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या प्रयत्नांना कुणीही अपशकुन करू नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

चव्हाण राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते – नाना पटोले
पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे मोठे नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी पवारांना दिलेे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -