घरमहाराष्ट्रनुकसान भरपाईपासून महाडचे शेतकरी वंचित

नुकसान भरपाईपासून महाडचे शेतकरी वंचित

Subscribe

तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आल्यानंतर नियमाप्रमाणे भरपाई दिली जात आहे. मात्र ३० गावांतील शेतकरी अद्याप भरपाईपासून वंचित राहिले आहेत. आतापर्यंत १ कोटी ७५ लाख रुपये वाटप करण्यात आले असून, शासकीय नियमाप्रमाणे कोकणातील शेतकर्‍यांना हेक्टरी ८ हजारांची मदत जाहीर झाली आहे.

या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. शेतकर्‍यांना प्रति हेक्टर ८ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने तालुक्यामध्ये ८ हजार ५८६ शेतकरी बाधीत झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रथम टप्पा म्हणून २ कोटी २८ लाख १७ हजार १८२ नुकसान भरपाई दाखल झाली. ८ हजार ५८६ हजार शेतकर्‍यांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे. अतिदुर्गम भागांमध्ये देखील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले गेले आहेत.

- Advertisement -

तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यातर्फे भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. २ हजार ४०० शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे जरी करण्यात आले असले तरी सुमारे ८ हजार शेतकर्‍यांचे भाताचे नुकसान झाले आहे. यापैकी ७ हजार २५ शेतकर्‍यांना १ कोटी ७५ लाख १२ हजार ६९३ रुपये वाटप झाले आहे. तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ असून, त्यातील बरीचशी शेती उतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहेत. २०३ शेतकर्‍यांनी पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्स्युरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला आहे. मात्र ज्यांना नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे त्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -