घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहानगर IMPACT : लाचखोर खरेवरील आरोपांची लागली चौकशी; सहकार आयुक्तांनी दिले आदेश

महानगर IMPACT : लाचखोर खरेवरील आरोपांची लागली चौकशी; सहकार आयुक्तांनी दिले आदेश

Subscribe

नाशिक : लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतिश खरे याला 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर आपलं महानगरसह शहरातील वर्तमानपत्रांमधून खरेवर झालेल्या आरोपांची गंभीर दखल सहकार आयुक्तांनी घेतली आहे. या आरोपांची सखोल चौकशी करुन त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

15 मे रोजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. एवढी मोठी रक्कम लाच स्वरुपात स्विकारल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. खरेच्या घरातूनमोठी रक्कम आणि काही सोने जप्त करण्यात आले होते.

- Advertisement -

खरेला अटक झाल्यानंतर त्याच्या विविध कारनाम्यांबाबत माय महानगरने स्पष्ट भूमिका घेत खरेच्या कारभाराचा बुरखा फाडला होता. यात खरे हा शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना तसेच, जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत असताना त्याने केलेल्या भ्रष्ट कामाच्या विरुद्ध वर्तमानपत्रांनी राळ उठवली होती. यादरम्यान खरेचे अनेक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. खरेचे व्यक्तिमत्व वादग्रस्त असल्याने त्याच्याविरुद्ध सातत्याने वेगवेगळे गंभीर आरोप झाले. याची दखल घेत सहकार आयुक्त ज्ञानदेव मुकणे यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांना खरे याच्याविरुद्ध झालेल्या आरोपांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन आपले अहवाल स्वयंस्पष्ट व कार्यवाही सूचक अभिप्रायांसह विनाविलंब आयुक्त कार्यालयात सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या कामात कुठलीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुकणे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सतीष खरे याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत असुन, खरे याचे आणखी किती कारनामे उजेडात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी ८८८८८००८०९ किंवा 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

- Advertisement -

तक्रारी असल्यास करा ‘माय महानगर’शी संपर्क

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून झडत होती. परंतु, त्यांचे हात एवढ्या वरपर्यंत पोहोचलेले होते की, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता मात्र खरेंचे खोटे कारनामे पुढे येत आहेत. या संदर्भात ‘आपलं महानगर’मध्ये बुधवार (दि. १७)पासून ‘खरेंचे खोटे कारनामे’ ही वृत्त मालिका सुरु झाली आहे. खरेंच्या कारनाम्यांसदर्भात पुराव्यांसह माहिती असल्यास ९९७५५४७६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -