“आम्ही घरी बसणारे नाही…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे दाखल झाले आहेत. याच कार्यक्रमाचे निमित्त साधून एकनाथ शिंदे यांनी सभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

What is 'Shasan Apalya Dari Yojana', CM Eknath Shinde informed

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे दाखल झाले आहेत. याच कार्यक्रमाचे निमित्त साधून एकनाथ शिंदे यांनी सभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. तर हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. हे सरकार ऑनलाइन काम करत नाही. आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray) या कार्यक्रमस्थळी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेली गैरसोय लक्षात घेता शासन आणि प्रशासनाकडून या कार्यक्रमाची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.

हेही वाचा – खरेंचे खोटे कारनामे : खरेच्या काळात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात “रात्रीस खेळ चाले”

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे. सर्वसामान्यांचे जीवन बदलले पाहिजे. त्यांच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे दिवस आले पाहिजेत. शासन हे जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे शासन असावे लागते. त्यामुळे आम्ही घरी न बसता लोकांच्या दारी शासन आणण्याचे काम केले आहे, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सामान्य माणसाला सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत. सरकारी काम, 6 महिने थांब हे पूर्णपणे बदलायचं आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

पूर्वीप्रमाणे आता कोणतेही स्पीड ब्रेकर नाही…
“अधिकारी वर्ग आता गावोगावी जाऊ लागलेत. तेथील लोकांना लाभ कसा मिळेल हे ते पाहातायत. सरकारनं घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर अधिकारी हे महत्त्वाचा दुवा ठरतील. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. ती समान वेगानं धावली पाहिजे. ती समान वेगानं धावल्यास त्या शहराचा, जिल्ह्याचा, राज्याच्या विकास वेगानं होत असतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून अधिकारीही चांगले काम करतायत. पूर्वीप्रमाणे कोणतेही मध्ये स्पीड ब्रेकर नाही, त्यामुळे गाडी सुसाट जायला हरकत नाही,” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

मी आजही कार्यकर्ताच…
आम्ही 24*7 काम करणारे कार्यकर्ते आहोत. मी आज मुख्यमंत्री म्हणून समोर उभा असलो तरी कालही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. बाळासाहेब आणि आनंद दीघे यांनी जी शिकवण दिलीये त्याच माध्यमातून आपण राज्याला पुढे नेतोय, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.