Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशनात ३२ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात राज्य सरकारला रस, चंद्रकांत पाटलांचा आरोप

Maharashtra Assembly Winter Session 2021 chandrakant patil slams thackeray government in assembly
Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशनात ३२ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात राज्य सरकारला रस, चंद्रकांत पाटलांचा आरोप

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला फक्त ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करण्याची इच्छा आहे. अधिवेशन कमी काळात उरकणे हे लोकशाहीला धरुन नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आज सभागृहात पेपर फुटीवरुन आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर, शेतकऱ्यांच्या विम्याविषयी काय बोलायला सरकार तयार नाही. राज्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन वाढवले पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे काय करणार आहेत. पेपर फुटीच्या विषयामध्ये काय चौकशी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विम्या विषयी काय करणार, नुकसान भरपाई, खोटी बिले आल्यामुळे वीज खंडीत करण्यात येत आहे ते थांबवणार का? कशाचे उत्तर आले नाही. त्यामुळे अजून काही दिवस हे अधिवेशन वाढवले पाहिजे असा आग्रह करणार आहोत. त्यांना अधिवेशनात इच्छा फक्त ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे, १९ विधेयके संमत करुन घेणे आणि शक्य असेल तर विधानसभा अध्यक्षांची निवड करणे एवढीच त्यांची इच्छा आहे. हे सगळं करु परंतु अधिवेशन १ ते २ आठवडा अजून वाढवावे अशी आमची इच्छा आहे. दरवेळी कमी वेळात अधिवेशन उरकणे हे लोकशाहीला धरुन नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

लोकशाहीची पायामल्ली करण्याचे सरकारने ठरवलंय

लोकशाहीची पायमल्ली करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्याप्रमाणे त्यांनी नियम समितीचा नियम बदलला आहे. वर्षानुवर्षे जी गुप्तमतदान पद्धतीने अध्यक्ष निवडीची पद्धत आहे ती त्यांनी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लावतात का? की पुन्हा पुढे ढकलतात? असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागली तर भाजपची कोर कमिटीची बैठक घेऊन भाजपकडून उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पेपर फुटीवरुन आक्रमक भूमिका घेणार

आज सभगृहात पेपर फुटीप्रकरणावरुन प्रचंड आक्रमक भूमिका घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. कारण अजूनही सरकार हे प्रकरण हलक्याने घेत आहे. अधिकाऱ्यांकडे सोनं, रोकड सापडत असल्याचे सगळे मांडले आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. सीबीआय चौकशी नको तर कुठलीतरी चौकशी लावा आणि प्रकऱण स्पष्ट करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम आज जाहीर होणार?