Maharashtra Band : शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेला भाजपचे अप्रत्यक्ष समर्थन, जयंत पाटलांचा संताप

Maharashtra Band 2021 jayant patil slams bjp over opposing maharashtra bandh against lakhimpur violence
Maharashtra Band : शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा घटनेला भाजपचे अप्रत्यक्ष समर्थन, जयंत पाटलांचा संताप

लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या घटनेविरोधातील ‘महाराष्ट्र बंद’ला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “लखीमपूर हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा घराघरातून महाराष्ट्रातून निषेध होईल. या बंदला विरोध करणे म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेला अप्रत्यक्ष समर्थन आहे.” असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. मुंबईतील ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनामध्ये सहभागी झाले असताना ते माध्यमांशी बोलत होते.

“लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड”

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीतील तिनही पक्ष आणि मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्य़ांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. यात भाजपा त्यांचे राजकीय मत आग्रहाने मांडतय हे समजू शकतो. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे. भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवांनी हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही. त्याला सन्मानाने बोलावले जाते.” असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

“लखीमपूर हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते.”

“भाजपाला शेतकऱ्य़ांचे आंदोलन चिरडण्याचे काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. परंतु लखीमपूर हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल. असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. भाजपा महाराष्ट्र बंदला विरोध दर्शवत लखीमपूरमधील शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेला अप्रत्यक्षपणे समर्थन देत आहे. मात्र भाजपाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला सर्वच स्तरातून विरोध होताना दिसतोय. आजचा बंद कुणावरही लादण्यात आलेला नाही. बहुतेक ठिकाणी लोकच यात सहभागी होतायत.” असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.