घरताज्या घडामोडीविधानपरिषदेच्या जागेवर उद्धव ठाकरेंना संधी; कॅबिनेटकडून राज्यपालांना विनंती

विधानपरिषदेच्या जागेवर उद्धव ठाकरेंना संधी; कॅबिनेटकडून राज्यपालांना विनंती

Subscribe

उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर निवड करण्यात यावी, अशी शिफारस ९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आल्यानंतरही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीत त्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांना करून तातडीने कार्यवाही करावी, असा पुनरुच्चार केला आहे.

दरम्यान राज्यपालाकडून होणाऱ्या उशिरामुळे सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच तू तू मै मै पहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर यावरून राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, का कळत नाही; पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येते”, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर भाजपकडून देखील संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यावरूनच भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

- Advertisement -

सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर होत आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी केला होता. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी “राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे… काय होतं ते? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो… हे सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते.. समझने वालो को इशारा काफी है”, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले होते.

आता तरी राज्यपाल निर्णय घेणार का?

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीला राज्यपालांकडून होणाऱ्या विलंबामुळे राज्यात कोरोनाच्या संकटामध्ये वातावरण तापलेले असताना आता राज्यपाल महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केलेल्या या
पुनरुच्चाराला काय प्रतिसाद देत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -