स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर, जे. पी. नड्डा यांच्याकडून कौतुक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला आहे. स्टार्ट अपमध्ये (Startup) महाराष्ट्र आघाडीवर असून ५०० कोटी रुपये इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

हेही वाचा – राज्यात तीन लाख रोजगार निर्माण करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमांची आखणी केली आहे. आता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचे मुंबईत दौरे आयोजित करून भाजपाने मुंबईकरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यानुसार जे. पी. नड्डा यांनी बुधवारपासून दोन दिवस मुंबई, पुण्याचा दौरा केला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे गुरुवारी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व जे. पी. नड्डा उपस्थित होते. आगामी काळात तीन लाख रोजगार निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पहिले आणि ‘स्क‍िल इंडिया मिशन’ सुरू झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुन:प्रशिक्षण गरजेचे आहे. पुन:प्रशिक्षणानंतर पुन्हा अद्ययावत होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत एक कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

हेही वाचा – The Kerala Story काल्पनिक, निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात कबुली; चित्रपटाच्या सुरुवातीलाच करणार खुलासा

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा खासदार मनोज कोटक, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.