घरमहाराष्ट्रआजपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन; विरोधकांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री

आजपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन; विरोधकांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री

Subscribe

नागपुरमध्ये आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगणारच हे नक्की!

आजपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील भूखंड घोटाळ्याचे आरोप, नाणार प्रकल्प, धुळ्यातील हत्याकांड, जळगावातील जामनेर येथे विहीरीत पोहायल्या गेल्याने मुलांना झालेली मारहाण आणि कर्जवाटपाच्या मुद्यावर सरकराला लक्ष्य करण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे या सर्व मुद्यांवरून नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये वादळी चर्चा होणार हे नक्की. अनेक वर्षानंतर नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी प्रथमच लक्ष्य करत त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला आहे. शिवाय, कोकणातील नाणारसह धुळ्यातील हत्याकांड प्रकरणावरून देखील नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडाडताना दिसतील. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यातूनच विरोधकांची आक्रमक भूमिका लक्षात येते. विशेषतः मुख्यमंत्र्यांवर केलेल्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपाचे पडसाद हे अधिवेशनामध्ये उमटतील. त्यासाठी विरोधकांनी जय्यत तयारी केली असून मुख्यमंत्री या सर्व आरोपांना काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी फेटाळले आरोप

विरोधकांनी केलेले भूखंड घोटाळ्याचे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. संबंधित निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरचा असून ३० वर्षांपासून याच पद्धतीने जमीन विक्री केली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच विरोधक म्हणतील त्या पद्धतीने चौकशी करायला तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पण, विरोधक मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. जिल्हाधिकारी आपल्या पातळीवर असा निर्णय घेऊच शकत नाहीत, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नाणारवरून शिवसेना आक्रमक

कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कोकणातील जनतेच्या मागे उभा असून नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द करत असल्याची घोषणा कोकण दौऱ्याच्या वेळी कोली होती. पण, त्यानंतर देखील शिवसेनेला विश्वासात न घेता भाजपने केंद्रात सौदीतील कंपनीशी नाणार प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला. परिणामी, नाणार प्रश्नी अधिवेशनामध्ये शिवसेना आक्रमक होणार हे नक्की. एकंदरीत अनेक मुद्यांवर पावसाळी अधिवेशन गाजणार असून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवाय, मित्रपक्ष असलेली शिवसेना विविध प्रश्नांवरून काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -