कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य सरकारचा विचार

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात येईल, असे कळते. तर १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता करण्यात येणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढवण्यात येणार असून रेड झोनमध्ये व्यवसाय उद्योगाचे ठप्प झालेले चक्र सुरू करताना कोरोना बाबतची काळजी अधिक घेतली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोराना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. १७ मे नंतर लॉकडाऊनच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरु होती. अर्थचक्र सुरु रहावं यासाठी राज्यातील आणखी किती उद्योग सुरु करता येतील याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊनचा टप्पा घोषित करण्यात आला. हा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपून दुसरा लॉकडाऊन १४ एप्रिल ते ३ मे असा होता. तर सध्या सुरू असलेला लॉकडाऊन ३ मे रोजी सुरू झाला असून त्याचा कालावधी १७ मे पर्यंत आहे. १७ मे नंतर चौथया लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्याची दोन दिवस बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याबाबत चर्चा झाली. लवकरच सरकार याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करणार आहे. मात्र हा लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरू राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियम टाकून काही उद्योगधंदे सुरू केले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरू करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही व्यवहार सुरू करण्याची घोषणाही लॉकडाऊन वाढवताना केली जाऊ शकते.