कालच्या सभेतून महाराष्ट्राचा कौल स्पष्ट, संजय राऊतांची प्रतिक्रिया

संग्रिहत छायाचित्र

मुंबई – ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची, काल रविवारी खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत अभूतपूर्व गर्दी होती. या गर्दीवरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा कौल कोणाला आहे हे स्पष्ट झालं आहे असं म्हणाले. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेला खिंडार पडले होते. त्यातच, केंद्रीय निवडणूक आयागाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये पहिलीच जाहीर सभा घेतली. या सभेला प्रचंड गर्दी होती. “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरलं असलं तरी कोकणातील जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. काल खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती. कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला. आता तुम्ही आव्हान सभा वगैरे घेतल्या तरी काही फरक पडणार नाही.ृ कोकण आणि शिवसेना अतुट नातं आहे काल दिसलं, असं संजय राऊत म्हणाले.

जनतेचं मन काबिज करण्याची मोहीम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जनता संतप्त आणि चिडलेली आहे. शिवसेना हा निवडणूक आयोगाच्या बापाची नाही. जनतेची आहे. जनतेचा महासागर खेडच्या मैदानात उसळला होता. विरोधक काय म्हणतात त्याला उत्तर देण्याची गरज नाही. मिंधे गटाला भाजपा स्क्रिप्ट लिहून देतं, असा पलटवारही त्यांनी केला.

तसंच, खेडच्या सभेनंतर कोकणता राजकीय शिमगा सुरू झाल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, “आम्ही अजिबात शिमगा करत नाही. आम्हाला शिमगा करण्याची गरज नाही. जनता आपोआप त्यांचा शिमगा करेल.”

प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. देशात काय परिस्थिती आहे हे या पत्राच्या माध्यमातून लिहिण्यात आले आहे. जे बोलतात त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत. विरोधकांवर तपास यंत्रणांचे हल्ले केले जातात. खरंतर हे सर्व मोदींच्या आदेशानेच सुरू आहे, त्यामुळे त्यांना पत्र लिहिण्याची गरज नव्हती. पण तरीही आम्ही पत्र लिहून आमचं काम केलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.