घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहाविकासला भाऊबंदकी नडणार; शिंदे गट फिका; भाजपची मोर्चेबांधणी

महाविकासला भाऊबंदकी नडणार; शिंदे गट फिका; भाजपची मोर्चेबांधणी

Subscribe

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण, असा वाद रंगलेला आहे. या ‘भाऊबंदकी’च्या भांडणात प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी वा उद्धव सेनेपैकी कोणीही निवडणुकीच्या तयारीची साधी सुरुवातही केलेली दिसत नाही. दुसरीकडे शिंदे गटाची हवा फिकी होताना दिसत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता या मतदारसंघात भाजपकडून नाशिक मतदारसंघ पिंजायला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सर्वच पक्षांनी ‘ग्राऊंड वर्क’ सुरू करणे अपेक्षित होते. विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेकडून या तयारीला आता वेग यायला हवा होता. प्रत्यक्षात संपूर्ण मतदारसंघाचा कानोसा घेतला असता अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांव्यतिरिक्त काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पातळीवर कोणत्याही राजकीय हालचाली होताना दिसत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्याकडून तब्बल दोन लाख मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर समीर भुजबळ यांनी जणू या मतदारसंघातील कामकाजच बंद केले.

- Advertisement -

वास्तविक, मध्यंतरीच्या काळात शिंदे गटाने ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या सेनेला सुरुंग लावला ती बाब सर्वसामान्यांना रुचलेली दिसत नाही. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची कामगिरी जरी फारशी चमकदार नसली तरी त्यांच्या पक्षाला शिंदे गटाच्या बंडामुळे सहानुभूतीची किनार लाभली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडे बघण्याचा मतदारांचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक झाला आहे. त्याचा थेट फटका विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना बसण्याची शक्यता आहे.

खा. गोडसे सलग दोनवेळा निवडून आल्याने त्यांना ‘अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी’चाही फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेता आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव सेनेने कंबर कसणे गरजेचे होते. प्रत्यक्षात अद्याप कोणत्याही उमेदवारांची नावे पुढे येताना दिसत नाही. अन्य जिल्ह्यातून आयात उमेदवारांना नाशिककर स्वीकारणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला स्थानिक उमेदवाराचाच शोध घ्यावा लागेल.

- Advertisement -

\सद्यस्थितीत काही उमेदवारांची नावे पुढे येत असली तरीही यापैकी कोणीही मतदारसंघात प्रचाराला अद्याप सुरुवात केलेली नाही. वास्तविक, लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीला आतापर्यंत वेग येणे अपेक्षित होते. शिवसेनेच्या वतीने गेल्यावेळी विजय करंजकर यांनी उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली होती. त्यांना पक्षातीलच तात्कालीन पदाधिकार्‍यांची सक्षम साथ मिळत होती. परंतु, सद्यस्थितीत पक्षातील अनेक पदाधिकार्‍यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याने करंजकर कोणाच्या भरवश्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हा प्रश्न आहे.

दिनकर पाटलांचे नाव निश्चित?

एकीकडे लोकसभा निवडणुकीत सर्वत्र उदासीनता दिसत असताना दुसरीकडे भाजपकडून मात्र दिनकर पाटील यांनी जंग-जंग पछाडणे सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिका शाळा लोकार्पण कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. ‘दिनकर अण्णांना पुढे न्या’ या विधानातून पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जाते. त्यांचा मुलगा अमोल पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांची त्यांना भक्कम साथ लाभत आहे. सध्या नाशिक मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे. निवडून येण्याची क्षमता हा निकष लावला तर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे येण्याची दाट शक्यता या हालचालींवरुन दिसते. ‘शतप्रतिशत भाजप’ ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली असल्याचे बहुसंख्य मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -