घरमहाराष्ट्रमाळशेज घाट वाहतुकीसाठी बंदच

माळशेज घाट वाहतुकीसाठी बंदच

Subscribe

पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असणारा माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याच्या टप्प्यात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. या
पार्श्वभूमीवर रस्तेवाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर देखील परिणाम झालेला असतानाच पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असणारा माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून मुरबाडच्या तहसिलदारांनी यासंदर्भात पत्रक काढून हा आदेश दिला आहे.

malshej ghaat letter

- Advertisement -

सकाळीही बंद झाला होता महामार्ग

सोमवारी सकाळच्या सुमारास माळशेज घाटाशी संलग्न राष्ट्रीय महामार्गावर आवळेचीवाडी आणि आसपासच्या परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रामाणावर झाडं उन्मळून पडली होती. तसेच, माती देखील डोंगरावरून खाली आली होती. या पार्श्वभूमीवर या भागातून महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. २ जेसीबी मशीनच्या सहाय्याने ही माती आणि झाडं हटवण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर दुपारी साधारण १च्या सुमारास इथली एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.


हेही वाचा – अतिपावसामुळे माळशेजसह ‘या’ पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी!

अपघात टाळण्यासाठी निर्णय

मात्र, अजूनदेखील माळशेज घाट परिसरात ठिकठिकाणी दगड, माती रस्त्यावर येतच आहे. त्याशिवाय या भागात पावसाची संततधार आहे. धुक्यामुळे समोरचं दिसण्याचं प्रमाणदेखील (विजिबिलिटी) कमी झालं आहे. तसेच, दरड कोसळण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये, म्हणून पुढील आदेश प्रशासनाकडून मिळेपर्यंत माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यासंदर्भात मुरबाड आणि टोकावडे परिसरातील पोलीस प्रशासनाला देखील माहिती देण्यात आली असून मुरबाडच्या तहसीलदारांच्या सहीनिशी एक पत्रच पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांनी या मार्गाचा वापर न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -