घरताज्या घडामोडीजीवे मारण्याच्या धमकीचे पत्र हा एकनाथ शिंदेंचा स्वस्त प्रसिद्धीचा प्रयत्न, माओवाद्यांनी फेटाळली...

जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र हा एकनाथ शिंदेंचा स्वस्त प्रसिद्धीचा प्रयत्न, माओवाद्यांनी फेटाळली जबाबदारी

Subscribe

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपुर्वी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचे पत्र मिळाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. माओवादी संघटनेकडून पत्राद्वारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र हा एकनाथ शिंदे यांनीच प्रसिद्धीसाठी स्टंट केला असल्याची प्रतिक्रिया माओवाद्यांच्या प्रवक्त्याने पत्राद्वारे दिली आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीत अनेक कामे सुरु असल्यामुळे नक्षलवादी मुख्य प्रवाहात आले असल्याने नाराज झाले आहेत.

माओवाद्यांचे प्रवक्ते श्रीनिवास यांनी पत्र लिहून एकनाथ शिंदे यांच्यावरील हल्ल्याचा आरोप फेटाळला आहे. श्रीनिवास यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे की, मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली. यामध्ये माओवादी पार्टीचं नाव घेण्यात आले असून याचा आम्ही निषेध करतो. स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी काही दलाल नेते अशा प्रकारचे प्रयत्न करत असतात. एकनाथ शिंदेंनी गडचिरोली जिल्ह्यात जनतेवर दमन करण्यासाठी वातावरण बणवण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे अशी शक्यता असल्याचे माओवादी प्रवक्ते श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी स्वतःची हत्या करण्याचे स्वतःच खोटे कारस्थान एनआयएद्वारे रचले होते. गडचिरोलीतील जनता शिवसेनेविरोधात संतप्त आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार गडचिरोली जिल्ह्याला न्याय देण्यासाठी अपयशी ठरले आहेत. महाविकास आघाडीमधील शिंदे आणि वडेट्टीवार या कोणत्याही नेत्यांना जनतेसमोर येण्यासाठी नाक उरले नाही. धमकीची सनसनी हा याच ब्राम्हणी हिंन्दूत्व फासीवादी राज्यनीतिचा एक प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो असे श्रीनिवास यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

दरम्यान धमकीच्या पत्रानंतर शिंदे म्हणाले की, गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या आल्या आहेत. पण या धमक्यांचा परिणाम माझ्यावर झालेला नाही. गडचिरोलीचे पालकमंत्री घेतल्यानंतर असे प्रकार होत असतात. गडचिरोलीचा विकास हाच नक्षलवाद संपवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मलिकांच्या अखत्यारीतीतील महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार; ईडीचे ७ ठिकाणी छापे


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -