घरमहाराष्ट्रमंत्रीपदासाठी गाठीभेटी!

मंत्रीपदासाठी गाठीभेटी!

Subscribe

भाजपला हवे गृह, अर्थ, महसूल खाते तर शिंदे गटालाही हवी वजनदार खाती,६ आमदारांमागे १ मंत्रीपदाचा फॉर्म्युला, आठवड्याभरात मंत्रीमंडळ विस्तार

महाविकास आघाडी सरकारला खाली खेचत सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप गृह, अर्थ, महसूल खात्यावर अडून बसले असून शिंदे गटालाही वजनदार खाती हवी आहेत, शिंदे गटाच्या वाट्याला नगरविकास, सहकार, सार्वजनिक बांधकाम, कृषी, आरोग्य ही खाती येण्याची शक्यता आहे. भाजप-शिंदे गटात मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला असून ६ आमदारांमागे १ मंत्रीपद मिळू शकते. तसे झाल्यास शिंदे गटाच्या वाट्याला अवघी 1४ मंत्रीपदे, तर भाजपला 2८ मंत्रीपदे मिळतील. मंत्रीपदाच्या वाटपामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार १३ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंळात वर्णी लागावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी आमदारांनी घ्यायला सुरूवात केली आहे. येत्या दोन दिवसात शिंदे आणि फडणवीस दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करतील.

शिंदे सरकारमध्ये भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. शिंदे गटामध्ये ५०, तर भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यानुसार भाजपला २९ मंत्रीपदे आणि १३ मंत्रीपदे शिंदे गटाला मिळतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडे एकूण १५ खाती होती, परंतु आता शिंदे गटाची ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री अशा केवळ १३ मंत्रीपदांवर बोळवण झाल्यास आमदारांनाही ते पटणारे नसेल. सूत्रांच्या माहितीनुसार गृह, महसूल व अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती भाजपच्या वाट्याला यावीत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, तर शिंदे गटाला नगरविकास व रस्ते विकास महामंडळ खाते मिळण्याची शक्यता आहे. मविआ सरकारमध्ये ही दोन्ही खाती एकनाथ शिंदेंकडे होती. मविआ सरकारमधील शिवसेनेकडे असलेली खातीच शिंदे गटाकडे राहावीत यासाठीही फडणवीस प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

शिंदे गटात कोणाला संधी?

शिंदे गटातील ४० आमदारांपैकी काहींनाच मंत्रीपद मिळेल. मविआत शिंदे गटातील ७ मंत्री असल्याने या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळेल. दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बच्चू कडू, दीपक केसरकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यात येईल.

- Advertisement -

जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग पालकमंत्रीपदासाठी चढाओढ
संघटना वाढवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये महामंडळे आणि जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठीही चढाओढ सुरू आहे. जळगाव, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी प्रत्येकी दोन-दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात चांगले बळ मिळावे यासाठी भाजप आग्रही आहे. जळगावचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांच्याकडे होते, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे होते. सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या नितेश राणेंना जबाबदारी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, तर शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची नावे चर्चेत आहेत, तर कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -