घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका

महाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळे सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती मनसेकडे जावी. महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले. महाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असेही पाटील म्हणाले.पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी शिवसेनेचा हितचिंतक असल्याचे म्हटले. नागरिकत्व कायदा देशातून कुणालाही बाहेर काढण्यासाठी केलेला कायदा नाही.

हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी करण्यात आला आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याकडे बोट दाखवत उद्धव ठाकरे या कायद्याशी सहमत असतील तर त्यांनी हा कायदा महाराष्ट्रात लागू करावा. महाराष्ट्रात या कायद्याविरोधात सुरू असलेली आंदोलने थांबवावीत, असे आवाहन पाटील यांनी केले. वीर सावरकरांवर काँग्रेसच्या नेत्यांकडून अत्यंत गलिच्छ असे आरोप करण्यात आले. तेव्हा शिवसेना शांत का बसली, असा सवालही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याबाबत विचारले असता, हे घडले तेव्हा मी दिल्लीत होतो. मला कळताच मी आशिषला फोन केला व त्याला दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. त्यानुसार आशिषने दिलगिरी व्यक्त केली असून हा विषय आता संपला आहे, असे पाटील म्हणाले.

- Advertisement -

आमच्या सरकारच्या काळातील योजना रद्द करण्यात येत असतील तर त्याला आमची काहीच हरकत नाही मात्र एखादी योजना रद्द करत असताना त्याला पर्यायी योजना सुरू करायची असते, याचे भान सरकारने राखायला हवे, असे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवलं जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता यात कोणतेही तथ्य नसल्याचे पाटील म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला जे चित्र होते ते आता नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभांचा धडाका सुरू असून दिल्लीत भाजपचे वारे वाहू लागलेत, असे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -