घरताज्या घडामोडीएमआयएमच्या प्रस्तावाने आघाडीत खळबळ, महाविकास आघाडीला खुली ऑफर

एमआयएमच्या प्रस्तावाने आघाडीत खळबळ, महाविकास आघाडीला खुली ऑफर

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपकडून फूट पाडण्याची भाषा सुरू असतानाच दुसरीकडे असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाने महाविकास आघाडी सरकारसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असून शरद पवारांना निरोप पोहचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. खासदार जलील यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

एमआयएमच्या या ऑफरमुळे आता राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतून तसेच भाजप नेत्यांकडून एमआयएमच्या या ऑफरवर प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने एमआयएमची ही खुली ऑफर धुडकावली आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे हे त्यांच्याकडे सांत्वनासाठी गेले होते. यावेळी जलील यांनी टोपे यांच्याकडे एमआयएम महाविकास आघाडीत येण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. तुमचे तीन चाकांचे सरकार आहे. त्याला आणखी एक चाक जोडून चारचाकी बनवून आम्हाला सोबत घ्या, अशी खुली ऑफर जलील यांनी महाविकास आघाडीला दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हे माझ्या भेटीला आले होते. त्यांच्यासोबत राजकीय चर्चा झाल्याचे जलील यांनी सांगितले. एमआयएममुळे उत्तर प्रदेशात भाजपला जिंकता आले नाही. आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप संपुष्टात आणायचा असेल तर आम्हाला तुमच्यासोबत घ्या, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस सोबतही जाऊ. ही बाब राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी गंभीरतेने घ्यावी. राजेश टोपे यांनी पवार त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवावा, अशी विनंतीही जलील यांनी केली आहे.
आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत देखील आम्ही एकत्र लढायला तयार आहोत. फक्त औरंगाबाद महानगरपालिकेमध्येच नाही तर राज्यातही युती करायला तयार आहोत. भाजपने देशाला उध्वस्त केले असून त्यांच्याविरोधात आघाडी करायची असेल तर एमआयएमचा पाठिंबा असेल. पण कुणालाही आम्ही नको आहोत. फक्त मुस्लिमांची मते त्यांना हवी आहेत. काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो. त्यांनाही मुस्लीम मते हवी आहेत. तर मग काँग्रेसने यावे. आपण युती करु, असे जलील म्हणाले. आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी आणि बसपासोबत बोलणी केली होती. त्यांना मुस्लिमांची मते पाहिजे. पण एमआयएम नको होता, अशी टीकाही जलील यांनी केली.

- Advertisement -

औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे आदर्श नाही – संजय राऊत

भाजपा आणि एमआयएमची छुपी युती आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएमची युतीची ऑफर धुडकावली आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षाचेच सरकार राहील. चौथा कोण, पाचवा कोण यात तुम्ही का पडताय? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाराष्ट्रातील हे प्रमुख पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. हे आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात. औरंगजेब त्यांचा आदर्श आहे. हे महाराष्ट्राचे तसेच शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे उत्तर प्रदेश, बंगालमध्ये पाहिले. आधीच भाजपसोबत छुपी युती करतायत त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारचा कुठलाही संबंध येऊ शकत नाहीत. असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची काय भूमिका हे पाहायचे आहे – देवेंद्र फडणवीस

सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. तर आता सत्तेसाठी शिवसेनेची काय भूमिका असेल हे आम्हाला पाहायचे असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडी आणि एमआयएम एकत्र आले तरी भाजपला काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठीशी आहे. ते सर्व एकत्रित आले तरी ते शेवटी सर्व एकच आहेत. भाजपला हरवण्यासाठी सर्व एकत्र आले आहेत. परंतु भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे जनता मोदींनाच निवडून देईल. त्यांचा पराभव झाला तर यांना ईव्हीएम दिसते, बी टीम, सी टीम आणि झेड टीम दिसते. पराभव झाल्यानंतर टीका करत असतात. त्यामुळे आता शिवसेना काय करणार हे आम्हाला पाहायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एमआयएमने सिद्ध करावे, भाजपची बी टीम नाही – जयंत पाटील

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे अनेक उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले. त्याठिकाणी एमआयएमने लक्षणीय मते घेतली आहेत. त्यामुळे एमआयएमने सिद्ध करायला हवे की, ते भाजपची बी टीम नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव धुडकावला आहे. उत्तर प्रदेश असो की महाराष्ट्र या ठिकाणी एमआयएमचा रोल सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे हे स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीत ते भाजपला जिंकवणार आहेत की हरवणार आहेत ते आता कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

कोणताच कट्टरवाद मान्य नाही – बाळासाहेब थोरात

आम्हाला कुठलाच कट्टरवाद मान्य नाही. आम्ही सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारे आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. कोणत्याच समाजाचा, धर्माचा कट्टरवाद आम्हाला मान्य नाही. आम्हाला सर्वधर्मसमभाव हवा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे तत्त्वज्ञान आम्हाला मान्य आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

ही आनंदाची गोष्ट – सुप्रिया सुळे

राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचे असेल तर आले पाहिजे. समविचारी पक्ष एकत्र येणे ही आनंदाची गोष्टी आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएमच्या ऑफरवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे. सर्व राज्यांसाठी हे चांगले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

फडणवीसांचा हा बी प्लॅन – चंद्रकांत खैरे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमची ऑफर येण्यामागे फडणवीसांचा डाव असल्याचा दावा केला आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. परंतु सरकार पडत नसल्यामुळे त्यांनी असा प्रकार सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा बी प्लॅन असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एमआयएम आम्हाला ऑफर देऊ शकत नाही आणि शिवसेना त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना ४ महिने डांबून ठेवले ते आम्ही कसे सहन करणार? ही त्यांची छुपी ऑफर असून आमचे जुने मित्र हुशार आहेत. ही त्यांचीच कल्पना असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले.

मविआला फक्त इसिसचा प्रस्ताव येणे बाकी- नितेश राणे

एमआयएमच्या ऑफरवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, वाह.. एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी… कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे… आता फक्त इसिसचा प्रस्ताव येणे बाकी आहे… खरंच, करून दाखवलं.

अधिकृत प्रस्ताव पाठवावा – नाना पटोले

एमआयएमला काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारसरणी मान्य असेल तर त्यांनी अधिकृत प्रस्ताव पाठवावा. त्यावर विचार केला जाईल. तूर्त आमच्याकडे एमआयएमकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -