घरमहाराष्ट्रवादानंतर सपशेल लोटांगण

वादानंतर सपशेल लोटांगण

Subscribe

शाईफेकीच्या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची जाहीर माफी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करीत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोलीभाषेतील शब्द अनावधानाने निघाले. यात माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असा खुलासा करीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दाबद्दल माफी मागितली आहे.

या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी. ज्या पोलीस अधिकार्‍यांवर आणि पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली तीही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधकांच्या रडारवर आले होते. त्यापाठोपाठ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून या आगीत तेल ओतले. त्यातच पिंपरी-चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर हा वाद अधिकच भडकला, मात्र त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे, तर दुसरीकडे महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना आपण स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तबगार व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान नव्हे, असा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे, तर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांचा तीव्र निषेध केला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने येत्या १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे, तर १९ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांचा मुद्दा गाजणार आहे. या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणारे पत्र अमित शहा यांना लिहिले आहे. या पत्रावर ६ डिसेंबर २०२२ अशी तारीख आहे.

- Advertisement -

महापुरुषांचा अनादर आपण स्वप्नातही करू शकत नाही – कोश्यारी 
माझ्या भाषणातील छोटासा अंश काढून काही लोकांनी त्याचे भांडवल केले. मी शिकत होतो तेव्हा सर्व विद्यार्थी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू या सगळ्यांना आदर्श मानत होते, मात्र तरुण पिढी वर्तमानातील आदर्शही शोधत असते. म्हणूनच मी म्हणालो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी हेदेखील आदर्श असू शकतात. आज जगभरात देशाचा लौकिक वाढविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील तरुणांचा आदर्श असू शकतात. याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तर ते महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचेच लौकिक आहेत. मोगल काळातील त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असणारे महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या अवमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असे कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात अनेक महनीय व्यक्ती आपल्या घरातूनही बाहेर पडत नव्हत्या. तेव्हा मी या वयातही शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र ठिकाणांचे जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणार्‍या जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजालाही मी गेलो. गेल्या ३० वर्षांत या ठिकाणी जाणारा मी पहिलाच राज्यपाल असेन. मला राजकारणापासून दूरच राहायचे होते, मात्र पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह यामुळे मी महाराष्ट्राचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून अनावधानाने जर कधी चूक झालीच तर तात्काळ खेद व्यक्त करायला किंवा क्षमायाचना करायला मी कधीच संकोच करीत नाही. आपणच आता यासंदर्भात उचित मार्गदर्शन करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.

पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या -पाटील 
चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी. ज्या पोलीस अधिकार्‍यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तीही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करीत आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा, ही विनंती.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा जोतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करीत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करीत आलो आहे.

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोलीभाषेतील शब्द अनावधानाने निघाले. यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे, पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते, असे पाटील यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -