घरताज्या घडामोडीराज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी, सुरक्षाव्यवस्था वाढवली

राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी, सुरक्षाव्यवस्था वाढवली

Subscribe

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती रविवारी सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे हे ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबतच्या चकमकीत 25 नक्षलवादी मारले गेले होते. त्यात एका कमांडरचाही समावेश होता. या नक्षलवाद्यांना मारल्याचा बदला घेण्यात येईल, अशी धमकी या पत्रातून त्यांना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी नक्षलवाद्यांकडून एक पत्र पाठवण्यात आले. हे धमकीचे पत्र मिळताच ठाणे पोलिसांत यासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना याआधीही धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना असेच धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्याप्रकरणी वागळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

याआधीही मला अशा प्रकारच्या धमक्या मिळालेल्या आहेत. परंतु गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून तेथील शोषित, पीडितांना मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा उद्देश आहे. गडचिरोलीतील नक्षलवादाची समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विकास करणे हाच आहे, असे एकनाथ शिंदे यांनी शनिवारी बोलताना सांगितले होते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -