घरमहाराष्ट्र'व्हेंटिलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देणार'

‘व्हेंटिलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देणार’

Subscribe

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापि, तातडीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण येवू नये, जिल्ह्यातील नागरीकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयास व्हेंटीलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्याताआली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारतात आतापर्यंत ११७ रुग्णांची नोंद झाली आहेत. तर राज्यात एकूण ३७ रुग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या १० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८ रुग्णांचे नमुने तपासणीत निगेटिव्ह आलेले आहेत. एका व्यक्तीचा रिपोर्ट येणे बाकी असून आज एका व्यक्तीचा नमुना पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तथापि, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व धर्मियांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

- Advertisement -

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, व्यायामशाळा, तरणतलाव, मॉल्स आदि गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. कोरोना व्हायरसाचा धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांसाठी १० बेड राखून ठेवण्यात आले आहे. तर ५ बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली. याठिकाणी तातडीच्या उपाय योजना म्हणून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिल्यात.

कोरोना संदर्भातील उपाययोजनांविषयी पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडून माहिती जाणून घेतली. तसेच समाज माध्यमांतून कोरोना संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जावून समाजात भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी सर्व संबंधितांना दिलेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -