आमदार नितेश राणेंना पोलीस पाताळातूनही शोधून काढतील

शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणावर संजय राऊत यांनी व्यक्त केली भूमिका

महाराष्ट्राची संस्कृती आणि कायदे महाराष्ट्रातील नागरिकांना चांगलेच माहित आहेत. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे, ते आमदार नितेश राणेंना पाताळातूनही शोधून काढतील, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणावर ते बोलत होते.

राष्ट्रपती काय गोट्या खेळतात का?

सुधीर मुनगुंटीवार यांनी दावा केला होता की, हे सरकार आम्ही बदलू अन्यथा मी नाव बदलेन. यावर बोलताना राऊतांनी मुनगुंटीवारांनी शरसंधान साधलं. ते म्हणाले की, सरकार बरखास्त करणं हा काय पोरखेळ आहे काय? राष्ट्रपती हे आपल्या चंद्रपुरातील आपल्या जंगलात गोट्या खेळतात का, की आपण त्यांच्या घरी जाऊन धुणीभांडी करतात? की राष्ट्रपतींचे रबरी शिक्के तुम्ही घरी आणून ठेवलेत. अशा जहरी शब्दांत राऊतांनी मुनगुंटीवार यांचा समाचार घेतला. मुनगुंटीवारांना आता नाव बदलावेच लागेल आणि त्याची व्यवस्था आम्ही करू, असा इशाराही खासदार राऊतांनी दिला.