घरमहाराष्ट्रशहापुरातील २०० कोटींचे मुमरी धरणाचे काम मातीअभावी ठप्प

शहापुरातील २०० कोटींचे मुमरी धरणाचे काम मातीअभावी ठप्प

Subscribe

जलसंपदा विभाग चिंतेत, प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढणार

स्थानिक शेतकर्‍यांच्या आक्रमक विरोधामुळे गेली पंधरा वर्षे रखडून पडलेला ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचा बहुचर्चित असलेला शहापूर तालुक्यातील सारंगपुरी येथील मुमरी धरण प्रकल्पाचे काम मातीच्या अभावामुळे ठप्प पडले आहे. धरणाच्या भरावासाठी लागणारी माती ही धरणक्षेत्रात उपलब्धच नसल्याने अखेर मुमरी सिंचन प्रकल्पाचे प्रगतीपथावर सुरू असलेले उर्वरित काम हे तात्काळ थांबविण्याची नामुष्की जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांवर ओढावली आहे.

कोविडच्या संसर्ग काळात बंद असलेले मुमरी धरणाचे हे काम आता सुरू करण्याच्या हालचाली अभियंत्यांनी सुरू केल्या होत्या. परंतु धरणाच्या मुख्य गाभा भरावाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली काळी माती (मुरुम )ही धरण क्षेत्रात उपलब्ध नाही. बुडीत क्षेत्रात जी माती यापूर्वी उपलब्ध होती त्या मातीने बहुतांश भरावाचे काम संबंधित कंत्राटदाराने पूर्ण केले. मात्र, उर्वरीत कामासाठी जवळपास ९ लक्ष घनमीटर मातीची गरज आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागणारी काळी माती धरण क्षेत्रात उपलब्धच नसल्याने धरणाचे काम आता पूर्ण करायचे कसे, या चिंतेत मुमरी प्रकल्पाचे अभियंता सापडले आहेत. परिणामी मातीचा शोध अभियंत्यांनी सुरू केला आहे. धरण बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणापासून तालुक्यातील डोळखांब परिसरात माती उपलब्ध आहे. परंतु हे अंतर ५० किलोमीटर असल्याने एवढी मातीची वाहतूक करणे हे मोठे खर्चिक असे आहे. तसेच मातीच्या मोबदल्यात महसूल विभागालाही करोडो रुपयांच्या घरात सरकारी रॉयल्टी भरावी लागेल आणि हे सर्व जलसंपदा विभागास परवडणारे नाही.

- Advertisement -

मातीसाठी या प्रकल्पाचा खर्च हा दुपटीने वाढेल असे सांगण्यात येत आहे. केवळ आता मातीअभावी मुमरी प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. सुरुवातीपासून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या या धरण प्रकल्पास आवश्यक असलेली वनखात्याची जागा व इतर महत्वाच्या शासकीय परवानग्या मिळाल्यानंतर या धरणाच्या बांधकामासाठी अखेर जलसंपदा विभागाने हिरवा कंदील दिला होता.

जलसंपदा विभागाच्या सुधारित २०६ .०३ कोटी इतक्या मुमरी धरणाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाची प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर शहापूर तालुक्यातील सारंगपुरी आणि खैरे या परिसरात मुमरी धरणाचे काम प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरू झाले होते. गेली तीन वर्षे सुरू असलेल्या मातीच्या धरणाचे काम २५ टक्के पूर्ण झालेले आहे. आतापर्यंत ६० कोटी रुपये धरण बांधकामास खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. धरणाच्या पाणी बुडीत क्षेत्रात स्थानिक शेतकर्‍यांची २३२ हेक्टर जमीन जात असल्याने त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

या प्रकल्पात वनखात्याची ४१२ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. या जागेच्या मोबदल्यात केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याला एकूण ७६ कोटी रुपये जलसंपदा विभागाने भरल्याने या प्रकल्पास अंतिम मंजुरी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुमरी प्रकल्प हे मातीचे धरण असून या धरणाची एकूण लांबी १२४० मीटर इतकी आहे आणि ४९.९० मीटर एवढी महत्तम उंची धरणाची असणार आहे.

या धरणात एकूण पाणी साठा ७२.४० दशलक्ष घनमीटर २.५४ टी.एम.सी इतका असेल. या धरणाच्या डावा कालव्याद्वारे शहापूर तालुक्यातील १८ गावे व कल्याण तालुक्यातील २४ गावे अशा एकूण ४२ गावांतील ६३२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे धरण झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे शेतीक्षेत्र ओलीताखाली येणार असल्याने दुबार पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने या पाण्याचा अधिक उपयोग होणार आहे.

धरण क्षेत्रात भरावासाठी मातीच उपलब्ध नसल्याने मुमरी धरण प्रकल्पाचे काम आम्हाला तात्काळ बंद करावे लागले आहे. ही वस्तुस्थिती असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी मातीचा शोध आम्ही सुरू केला आहे. धरण क्षेत्रात जवळपास आवश्यक असलेली माती मिळताच रखडलेले हे पूर्ववत सुरू करण्यात येईल.
– उदय हावरे, उपविभागीय अभियंता, मुमरी धरण प्रकल्प, शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -