घरमुंबईमुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार

मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार

Subscribe

 प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या पेडररोडवरील बंगल्याजवळ संशयितरित्या पार्क केलेल्या स्कॉपिओ कारमधून पोलिसांनी जिलेटीन कांड्यासह इतर काही स्फोटके जप्त केली आहेत. या घटनेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही कार तिथे कोणी आणली याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. घटनेची माहिती मिळताच विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्मीचिअल रोडजवळ एक संशयित स्कॉपिओ कार होती. या कारमध्ये स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर गावदेवी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी दाखल झाले होते, काही वेळाने तिथे बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथकासह आले. या पथकाने संपूर्ण कारची तपासणी केल्यावर त्यात जिलेटीनच्या कांड्या, काही स्फोटके, अनेक नंबर प्लेट आणि इतर साहित्य सापडले. मात्र त्या जिलेटीन कांड्या असेम्बल करण्यात आल्या नव्हता. त्या कांड्या गाडीत एका कोपर्‍यात ठेवण्यात आल्या होत्या. स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याची माहिती मिळताच सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी तिथे धाव घेतली. या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होती.

- Advertisement -

या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास एटीएस आणि गुन्हे शाखेला दिला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही कार कोणी तिथे आणली, कारमध्ये किती लोक होते. ही कार पार्क करुन संबंधित आरोपी तेथून कसे गेले याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. मुकेश अंबानी यांना यापूर्वी धमकी आली होती. त्यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर जिलेटीन सापडल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलीस आयुक्तांना या प्रकरणाचा तातडीने तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -