घरमहाराष्ट्रमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आश्विनी भिडे

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आश्विनी भिडे

Subscribe

त्यामुळे त्यांची कारकीर्द तेव्हा वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर त्यांच्या जागी रणजित सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली होती

मुंबईः मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा पुन्हा एकदा आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा कार्यभार आश्विनी भिडेंकडे सुपूर्द करत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभारही अश्विनी भिडे यांच्याकडेच आहे. विशेष म्हणजे आधीच्या फडणवीस सरकारच्या काळातही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडे होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर ही जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडून काढून घेण्यात आली होती. आता पुन्हा ती त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा पदभार आपण स्वीकारावा, अशी विनंती आश्विनी भिडे यांना शिंदे सरकारकडून करण्यात आली आहे. तरी सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार एस. व्ही. आर. श्रीनिवास (भाप्रसे) यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, अशा सूचनाही आश्विनी भिडे यांना देण्यात आल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी आश्विनी भिडेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यामुळे त्यांची कारकीर्द तेव्हा वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर त्यांच्या जागी रणजित सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

कोण आहेत आश्विनी भिडे?

आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी जवळपास 24 वर्षे सेवा दिली आहे. राज्यात विविध महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली आहेत. भिडे यांनी 1997 ते 1999 या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1999 ते 2000 पर्यंत त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर त्यांची नागपूर जिल्ह्यात बदली झाली. भिडे यांची 2000 ते 2003 दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)पदी नियुक्ती करण्यात आली होती, जिथे त्यांनी 7,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी 3,00,000 रुपये खर्चून 310 गावांमध्ये 434 धरणे बांधली. 2004 आणि 2008 दरम्यान त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शालेय शिक्षण आणि क्रीडा सचिव म्हणूनही काम केले.


हेही वाचाः मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आश्विनी भिडे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -