मुंब्रा बनलाय खुनी गुन्ह्यांचा अड्डा

आठवडाभरात चार हत्यांमुळे मुंब्रा हादरले, खुनांच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीती

कळवा । मुंब्रा परिसरात चोर्‍या व घरफोड्या या घटना नेहमीच्या चर्चेत असताना गेल्या आठवडाभरात कौटुंबिक आणि इतर वादातून चार निर्घृण हत्येच्या घटना घडल्याने मुंब्रा परिसरात खुनी गुन्ह्यांचा अड्डा बनल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या 22 डिसेंबरला मुंब्र्यातील आरोपी अख्यतार खान आणि कौसा येथील मुस्तफा बागी यांचा ठेवायला दिलेल्या कोरेक्स सिरप बॉटल परत घेण्यावरून झालेल्या वादात हे भांडण सोडवायला गेलेल्या संनाम खान (30)याची अख्यार खान आणि त्याच्या पाच सहकार्‍यांनी धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच 24 डिसेंबरला मुंब्रा रेतीबंदर खाडीत 50 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने त्याचा मुंब्रा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

असे असताना 27 डिसेंबरला मुंब्रा रेल्वस्थानकाजवळील रिझवी बाग पार्किंग जवळ मुंब्र्यात राहणारा सुलतान शेख तेथे आल्यावर मृत इम्तियाज शेख (33)याने त्याला येथे का आलास? असे विचारल्यावर त्या गोष्टीचा राग मनात धरून सुलतान याने त्याच्या हातात असलेल्या सुर्‍याने इम्तियाजच्या पोटावर वार करून त्याची हत्या केली. तर त्याच दिवशी 27 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास मोहंमद शेख हा वाहन चालक राहणार जीवनबाग हा आपल्या आईचे औषध आणण्यासाठी दुकानात आला. त्यावेळी आरोपी बबली याने त्याला थांबवून त्याचे खिशातील पाकीट काढले या बद्दल जाब विचारला असता त्याला धमकावून शिवीगाळ करीत त्याच्या छातीवर, पोटावर चाकूने वार केले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून तो कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यानंतर 28 डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास अमृत नगर मधील फातिमा हाईट राहणार्‍या मृत सबा मेहंदी हाश्मी (37)हीची कौटुंबिक वादातून तिची 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या मित्राच्या मदतीने धारधार शस्त्राने गळ्यावर मानेवर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर दरवाजा बंद करून तेथून पळ काढला आहे.

या आठवडाभरात एका मागोमाग चार खुनांच्या घटनानी मुंब्रा पोलीस चिंतेत असून मुंब्रा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत मुंब्र्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. तर खून व घरफोडीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मुंब्रा परिसरात हत्यांचे प्रमाण वाढल्याने मुंब्रा पोलीसठाणे पुन्हा एकदा ठाणे शहरात नकाशात आले आहे. त्यामुळे या परिसरात येथील नागरिकांकडून मुंब्रा परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

या वेगवेगळ्या घटना असून त्या संदर्भात मुंब्रा पोलिसांचा योग्य रीतीने तपास सुरू असून या पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेतली जात आहे.
-विलास शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग