श्याम मानव, मुक्ता दाभोलकर आणि जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर

नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या अविनाश पवार याची पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी आज त्याला कोर्टात हजर केले. यावेळी एटीएसने श्याम मानव, मुक्ता दाभोलकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.

Shyam Manav, Mukta Dabholkar and Jitendra Awhad Target on Hindu Extremist

नालासोपारा स्फोटक प्रकरणात दहशतवादी विरोधी पथकाने धक्कादायक खुलासा केला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुढचे टार्गेट केले असल्याचे अविनाश पवार याच्या चौकशीतून समोर आल्याचा दावा दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयात केला आहे.

आज सत्र न्यायालयात याबाबत सुनावणी चालू असताना एटीएसने हा दावा केला आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणाच्या चौकशीतून ही बाब समोर आल्याची माहिती एटीएसने न्यायालयाला दिली. भांडुप येथून अटक केलेला सनातन संस्थेचा सदस्य आणि संशयित आरोपी असलेल्या अविनाश पवारच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी एटीएसने केली होती. यावर पुर्वीच्या तपासात काय निष्पन्न झाले याबाबत कोर्टाने विचारणा केली होती. त्यावर एटीएसने हा खुलासा केला.

वाचा – नालासोपारा स्फोटक प्रकरण; आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचारसरणीचे मानले जातात. त्यांनी वेळोवेळी हिंदुत्ववादाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यासोबतच श्याम मानव हे देखील नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच बुवा-बाजी आणि अंधश्रद्धेवर प्रहार करत आहेत. तसेच मुक्ता दाभोलकर नरेंद्र दाभोलकर यांच्या उत्तराधिकारी मानल्या जात आहेत. हे तिघेही आरोपींचे पुढले लक्ष्य होते, असा गौप्यस्फोट एटीएसने कोर्टात केला आहे.

अधिक वाचा – नालासोपारा स्फोटक प्रकरण; घाटकोपरमधून पाचव्या आरोपीला अटक