घरमहाराष्ट्रनाशिकसत्यजित तांबेंना २ एबी फॉर्म मिळाले होते तेही कोरे...; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

सत्यजित तांबेंना २ एबी फॉर्म मिळाले होते तेही कोरे…; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गौप्यस्फोट

Subscribe

सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. यात आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सर्वांच्या भुवया आणखीनच उंचावल्या आहेत.

विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर डॉ. सुधीर तांबेंना पक्षाने निलंबित केले. त्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. ‘मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता, पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला,’ असा खुलासा काँग्रेसमधून निलंबित झालेले सत्यजित तांबे यांनी केला. त्यामुळे नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात गोंधळाचं वातावरण दिसून आलं. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः पुढे येत यामागची सत्यकथा सांगितली आहे.

नाशिकच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघांची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या केंद्रस्थानी राहिली आहे. त्यात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. यात आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सर्वांच्या भुवया आणखीनच उंचावल्या आहेत.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. “नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा संधी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यानंतर तसे जाहीरही करण्यात आले. डॉ. सुधीर तांबे यांनी आम्हाला भेटून आमचे आभारही व्यक्त केले. पण त्यावेळी आपल्याऐवजी मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्याबाबत काहीच चर्चा केली नाही. जर त्यांनी त्यावेळीच चर्चा केली असती तर त्यावर चर्चाही झाली असती,” असं नाना पटोले म्हणाले.

बोलताना नाना पटोले म्हणाले की, “उमेदवाराला एखाद्या पक्षाची उमेदवारी देणं ही एका दिवसाची प्रक्रिया नसते. या मतदारसंघातही ती खूप लवकरच सुरू झाली होती. सत्यजित आणि भाजपमध्ये काहीतरी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत होती. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराचं नाव टाकून आणि एकच प्रत दिली जाते. पण आम्ही सावधगिरी बाळगत दोन एबी फॉर्म आणि तेही कोरे दिले होते. त्यांच्या घरगुती वादात आम्हाला पडायचं नव्हतं. म्हणून उमेदवारीचा निर्णय आम्ही त्यांच्यावर सोडून जो ठरेल त्याचं नाव अर्जावर दाखल करा, असंदेखील सुधीर तांबेंना सांगण्यात आलं होतं. शेवटपर्यंत डॉ. तांबे अर्ज भरणार असे सांगत होते. ऐनवेळी डॉ. तांबे यांनी अर्ज भरलाच नाही, सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

- Advertisement -

नाना पटोले यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात आला वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. भाजपने राजकीय खेळी करून सत्यजित तांबे यांनाच छुपा पाठिंबा दिला असल्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यातच निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील अर्ज माघारीच्या वेळी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -