घरमहाराष्ट्रभाजपची ढील तर मविआची घसटी निवडणुकीत मोठा ‘पेच’

भाजपची ढील तर मविआची घसटी निवडणुकीत मोठा ‘पेच’

Subscribe

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा राजकीय ‘पेच’ निर्माण झाला आहे. सत्यजित तांबेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली असतानाच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा राजकीय ‘पेच’ निर्माण झाला आहे. सत्यजित तांबेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली असतानाच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेने अधिकृत भूमिका घेतलेली नसली तरी तांबे आणि भाजपच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी मविआकडून पाटील यांना पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. या पेचात तांबेंच्या पाठिंब्याबाबत योग्य वेळी भूमिका जाहीर करीत भाजपने ढील देण्याची भूमिका घेतली, तर पाटील यांच्या पाठीशी उभे राहत मविआनेही हा पेच घसटण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर न करता सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही त्यावर विचार करू, असे सूचक विधान करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला धक्का दिला होता. काँग्रेस आणि भाजपमधील या राजकीय कुरघोडीत नाशिकमध्ये अपक्ष विरुद्ध अपक्ष अशी लढत होऊ घातली आहे.

- Advertisement -

मूळच्या भाजपच्या असलेल्या शुभांगी पाटील यांनी नाशिक पदवीधरमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची शक्यता असल्याने पाटील यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली.

सध्या तरी मी अपक्षच : शुभांगी पाटील
शुभांगी पाटील यांनी सांगितले की, शिक्षक संघटनेची मी गेली १० वर्षे अध्यक्ष होते. या मतदारसंघातील पदवीधरांसाठी मी लढले आहे. त्यासाठी मी स्वत: आझाद मैदानात आंदोलन केले आहे. म्हणूनच काम करणार्‍या व्यक्तीसाठी संधी मागितली होती, पण मला कोणत्याही पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवत आहे. मी पाठिंब्यासाठी सर्वच पक्षांकडे विनंती करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ठाकरे गटाचे नेते पाठिंब्याबाबत माध्यमांना कळवतील, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

सत्यजित तांबेंना टोला
मी या निवडणुकीत विजयी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून मी पहिली महिला आमदार असेल, असा विश्वास व्यक्त करीत राजाचा मुलगा म्हणून राजा होणार नाही तर ज्यामध्ये योग्यता आहे तोच राजा होईल, असा टोला शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना नाव न घेता लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -