घरफिचर्ससारांशबर्म्युडा ट्रँगलचे रहस्योद्घाटन!

बर्म्युडा ट्रँगलचे रहस्योद्घाटन!

Subscribe

जगातील आत्यंतिक धोकादायक समजल्या जाणार्‍या बर्म्युडा ट्रँगलच्या रहस्यावरून आता पूर्णपणे पडदा उठला आहे. कुणीही या भागाला आता नाहक घाबरता कामा नये. एवढेच नाही तर जगातील पहिल्या १० धोकादायक जागांमध्येही आता बर्म्युडा ट्रँगलचा समावेश केला जात नाही. येथे अजिबात अदृश्य शक्ती वगैरे काही नाही. खरंतर येथे फक्त काही नैसर्गिक घटना घडतात आणि या घटना येथे घडण्यामागचे कारणही विज्ञानाने जगासमोर आणले आहे. आपण विज्ञानाच्या भाषेत वाचतो तेव्हा आपल्याला ते नीट समजत नाही. बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य येथे अतिशय सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करत आहे.

–अमोल जगताप

फ्लोरिडा-बर्मुडा-पुटोरिको यांमधील अटलांटिक महासागराचा भाग बर्म्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जातो. बर्म्युडा ट्रँगल हे गेल्या पाच शतकांपासून एक रहस्य आहे. विशेष म्हणजे हा भाग येथे घडणार्‍या अप्रिय घटनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागावरून जाणारे विमान असो की येथील समुद्रातून जाणारे जहाज असो येथे आल्यावर हा भाग त्यांना गिळंकृत करतो. बर्म्युडा ट्रँगलने सुमारे ४४०,००० मैल समुद्राचे क्षेत्र व्यापले आहे. गेल्या पाच शतकांमध्ये या क्षेत्रात सुमारे १,००० जहाजे आणि विमाने बेपत्ता झाली आहेत. अगदी सन १४९२ मध्येही समुद्रात प्रवास करत असताना कोलंबसलाही या भागात काही रहस्यमय घटना दिसल्या होत्या. त्याने त्याबद्दल लिहूनही ठेवले होते. या भागात प्रवेश केल्यावर त्याला अचानक हवामानात बदल झालेला जाणवला. समुद्र प्रचंड खवळला आणि त्याचे जहाज प्रतिकूल परिस्थितीत अडकले. जहाजावर योग्य दिशा दाखवून प्रवासास मदत करणारे होकायंत्र (कंपास) अचानक काम करेनासे झाले. त्यात त्याला एक आगीचा गोळा लांबवर आकाशातून येऊन समुद्रात जाताना दिसला.

- Advertisement -

खरेतर या भागाला सर्वात आधी बर्म्युडा ट्रँगल या नावाने संबोधले गेले ते १९६४ मध्ये. व्हिन्सेंट गेडीस याने त्यावेळी लिहिलेल्या लेखात म्हटले होते की, हा भाग जहाजांना अचानक गायब करून टाकतो, म्हणून त्याने डेव्हील ट्रँगल असेही संबोधले होते. येथे आल्यावर विमानांचे इंजिन अचानक बंद पडून जातात, जहाज खाली ओढले जातात, येथे पोहण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही पोहता येत नाही आणि हे थोडे की काय या भागात बुडालेल्या जहाज, विमान यांचा थांगपत्ताही कुठे लागत नाही, असे बरेचसे वर्णन त्याने त्या लेखात करून ठेवले होते, पण हे का घडते त्याबद्दल मात्र त्याने काहीही मांडलेले नव्हते, मात्र त्याचा हा लेख आणि एकूणच बर्म्युडा ट्रँगल त्यामुळे तेव्हा एवढे प्रसिद्ध झाले की त्यानंतर त्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. अनेकांनी त्यावर सिनेमेही बनवले. काहींनी तर बर्म्युडा ट्रँगलवर गाणे बनवले आणि ते लोकप्रियही झाले. एवढेच काय तर बर्म्युडा ट्रँगलवर आधारित बरेच व्हिडीओ गेमसुद्धा बनवले आणि मोठ्या प्रमाणात खेळले गेले. थोडक्यात मोठी आर्थिक उलाढालही त्यावरून होत गेली, पण बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य काही उलगडले नाही. ही एखादी भुताटकी आहे की विज्ञानाचा चमत्कार, की आणखी काही याविषयी अनेक तर्कवितर्क करण्यात येत असत, मात्र त्याविषयी ठोस काही बोलण्यासाठी कुणाकडेही काहीच मुद्दे नसत.

१९४५ मध्ये अमेरिकेच्या नौसेनेचे पाच टोर्नेडो बॉम्बर विमान त्यांच्या १४ स्क्रू मेंबर्ससह फ्लोरिडावरून टेकऑफ करून बर्म्युडा ट्रँगलवरून जात होते. तेव्हा अचानक त्यांचा रेडिओ स्टेशनशी असलेला संपर्क तुटला. त्यांच्या विमानातील होकायंत्रही काम करेनासे झाले. आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी असणारे त्यांचे बॅकअप होकायंत्रसुद्धा बंद पडले. विमानाची नेव्हीगेशन सिस्टीमसुद्धा काम करेनाशी झाली आणि एकाएकी सर्वच विमाने कुठेतरी नाहीशी झाली. त्यानंतर या विमानांचे शेवटचे लोकेशन जेथे सापडले होते त्या अनुषंगाने एक बचाव पथक त्यांना शोधण्यासाठी पाठवले गेले, मात्र हे गेलेले पथकही परत आले नाही. या घटनांनी सर्वच हादरले गेले. अमेरिकेने त्यांना शोधण्यासाठी सर्वात मोठे सर्च ऑपरेशन राबवले, पण विमानाचा साधा एकही भाग त्यांना मिळाला नाही की कुणाचा मृतदेह.

- Advertisement -

१९७० साली एक ब्रूस जर्मन नामक पायलट सुदैवाने या भागातून कसाबसा निसटून परत आला होता. त्याच्यानुसार बर्म्युडा ट्रँगलवरून जाताना वातावरण अचानक खराब झाले आणि समोर ढगांचा प्रचंड मोठा कल्लोळ नजरेस पडला. विमान तसेच पुढे गेले अन् जणू त्या प्रचंड ढगांच्या गुहेतच मी प्रवेश केला असे जाणवत होते. काहीही दिसत नव्हते फक्त विमान पुढे जात होते असा अंदाज येत होता. विमानाचा वेग, लोकेशन काही काही समजत नव्हते. कारण सर्वच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, होकायंत्र, रेडिओ फ्रीक्वेंसी काहीही काम करत नव्हते. सर्वच हँग झाले होते. मला काहीही समजत नव्हते. फक्त विमान पुढे जात आहे हे समजत होते.

जवळपास तीन-चार मिनिटांनी त्यांचे विमान सुदैवाने यामधून बाहेर निसटले. नंतर कसेबसे इच्छित स्थळी पोहचल्यावर असे आढळून आले की त्यांच्या विमानाने त्या ३ मिनिटात तब्बल १५० किलोमीटर अंतर पार केले होते. म्हणजेच विमानाचा वेग ताशी ३००० किलोमीटर एवढा प्रचंड वाढला होता. हा वेग त्यांच्या विमानासाठी शक्यच नव्हता. या वेगाने फक्त काही लढाऊ विमाने वा मिसाईल अंतर कापू शकता, पण मग हे नेमके झाले कसे? बर्म्युडा ट्रँगल खूप वर्षांपर्यंत असाच एक रहस्यमय भाग बनून राहिला. लोकांच्या मनात त्याने भयंकर भीती भरून ठेवली की या भागात काही अदृश्य शक्ती आहे जी येथून जाणार्‍या जहाज वा विमानांना गिळंकृत करते.

पण प्रत्यक्षात असे काहीही नाही. या भागाच्या रहस्यावरून आता पूर्णपणे पडदा उठला आहे. कुणीही या भागाला आता नाहक घाबरता कामा नये. एवढेच नाही तर जगातील पहिल्या १० धोकादायक जागांमध्येही आता बर्म्युडा ट्रँगलचा समावेश केला जात नाही. येथे अजिबात अदृश्य शक्ती वगैरे काही नाही. खरेतर येथे फक्त काही नैसर्गिक घटना घडतात आणि या घटना येथे घडण्यामागचे कारणही विज्ञानाने जगासमोर आणले आहे. आपण विज्ञानाच्या भाषेत वाचतो तेव्हा आपल्याला ते नीट समजत नाही. बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य येथे अतिशय सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा विषय समजण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

बर्म्युडा ट्रँगल या भागात समुद्र तळाशी ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. तेथे ज्वालामुखीचे स्फोट झाले की त्यातून काही विषारी वायू बाहेर पडतात. यामध्ये मिथेन वायूचे प्रमाण जास्त असते. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मिथेन वायू पाण्यात मिसळला की त्यामुळे पाण्याची घनता (डेन्सिटी) कमी होते. येथे होते तेच! ज्वालामुखीतून निघालेला मिथेन वायू येथील समुद्राच्या पाण्याशी मिसळून त्या पाण्याची घनता कमी करतो, परंतु समुद्राच्या पाण्याच्या घनतेचा आधार धरून जहाजांची बांधणी (डिझाईन) केलेेली असते, पण या भागात पाण्याची घनता अचानक कमी झाल्यामुळे जहाज पाण्यावर न तरंगता आपोआप पाण्यात बुडू लागते. अगदी या भागात आपण पोहण्याचा प्रयत्न केला तरी ते अशक्य होऊन जाते आणि आपण क्षणात बुडून जातो. (जर तुम्हाला माहीत असेल की मृत समुद्रात माणूस न पोहताही बुडू शकत नाही. तेथेही हेच शास्त्रीय कारण लागू पडते. फक्त तेथील पाण्याची घनता खूप जास्त असल्यामुळे घटना फक्त विरोधी घडते. जास्त घनतेचे समुद्राचे पाणी बुडू देत नाही, तर कमी घनतेचे तरंगू देत नाही.)

तसेच बर्म्युडा ट्रँगलच्या परिसरात मोठमोठे समुद्री पर्वतदेखील आहेत. जोरदार वाहणार्‍या वार्‍याला येथे त्यामुळे रोध निर्माण होऊन मोठमोठी वादळे निर्माण होतात. समुद्रही खवळून निघतो. प्रचंड मोठ्या अशा चक्रीवादळांची निर्मिती होते आणि यात जर एखादे जहाज किंवा विमान अडकले तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाते. येथील काही समुद्री पर्वत हे समुद्राच्या पाण्याखालीदेखील आहेत. जहाजांना त्यांचा अंदाज न आल्यामुळे जहाजांचे खालचे भाग त्यांना धडकून अपघात होतात व जहाज जलसमाधी घेतात. आता तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे पाण्याखालच्या या गोष्टींवरही अचूक नजर ठेवून जहाजांची दिशा बदलून या प्रकारच्या अपघातांपासून जहाज सहज वाचवता येते.

या भागातील विमानांच्या दुर्घटनेमागे अजून एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे येथे आकाशात निर्माण होणारे हेक्झागॉनल क्लाऊड, म्हणजेच षटकोनी ढग. बर्म्युडा ट्रँगलमध्ये अत्यंत जड वस्तू खेचण्याची शक्ती ढगांच्या षटकोनी आकारातून येते, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे ढग ‘एअर बॉम्ब’ बनवतात. म्हणजेच हवेत बॉम्बस्फोटासारखी ताकद निर्माण करतात. या अतिविशाल (अंदाजे ५० वर्ग किलोमीटर) अशा ढगांमध्ये प्रचंड वेगाने चक्रीवादळासारखा वारा वाहत असतो. जवळपास ताशी २५० किलोमीटर वेगाने घोंगावत वाहणार्‍या या वार्‍याच्या विरुद्ध दिशेने एखादे विमान त्यात शिरले तर ते उद्ध्वस्त होऊन जाते. याउलट वार्‍याच्या वेगाच्या दिशेने त्यात विमानाने प्रवेश केला तर विमानाचा वेग प्रचंड वाढतो आणि त्यामुळे विमान उद्ध्वस्त होऊ शकते. एकूणच ही सर्व कारणे समोर आल्यामुळे आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे एकेकाळी गूढ आणि भीतिदायक असा वाटणारा बर्म्युडा ट्रँगल आता प्रवासासाठीही तेवढा भयानक राहिलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -