घरफिचर्ससारांशगोंडांच्या वैद्या

गोंडांच्या वैद्या

Subscribe

इंद्रा आणि चंद्रा या दोघी बहिणी म्हणजे वर्धा आणि पैनगंगा नदीच्या खोर्‍यातल्या येरावन, गोंड जमातीतल्या जुळ्या बहिणी. त्या दोघीही तिथल्या वैद्या म्हणजे डॉक्टरणी आणि संशोधिका होत्या. त्यांनी नवरा, मुलेबाळे असा स्वत:चा संसार केला नाही. त्यांनी आयुष्यभर वैद्यकी करून लोकांचे भले भले आजार बरे केले होते. एवढेच नव्हे तर त्या वैद्यकीबरोबरच त्यांनी प्रयत्नपूर्वक निसर्गज्ञानही प्राप्त केले होते. त्या ज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी जंगलाचे, त्यातल्या पाण्याच्या स्त्रोत, डोंगरदर्‍या आणि मातीचेही संवर्धन केले होते. कोण्या एका मुघल राजाने म्हणे त्या दोघींचाही त्याबद्दल सत्कारही केला होता, असे तिथले लोक सांगतात. गोंड समाजातल्या आद्य वैद्या अशा बहिणींची ही गोष्ट.

–मंजुषा देशपांडे

आलापल्ली जंगलातल्या एका गोंड वस्तीत भीमा कासू नावाचा एक वैद्य राहत असे. त्याच्या जुळ्या मुली म्हणजे ‘इंद्रा आणि चंद्रा.’ त्या वस्तीतल्या काळ्या कुळकुळीत गोंडांच्या पोरांच्या मानाने त्या दोघी जरा भुर्‍या रंगाच्या, सोनेरी केसांच्या आणि निळसर डोळ्यांच्या अशा सुरेख होत्या. त्या दिवशी त्या दोघीही दीपावलीनंतर केल्या जाणार्‍या सुआ नृत्यासाठी तयार झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या लांबसडक केसांचे अंबाडे घालून त्यामध्ये गवतांचे रंगीत तुरे खोचले होते. त्या हंगामात झेंडू, कोलनकुटकी, शेवंतीसारख्या पिवळ्या, केशरी आणि लाल फुलांनी रान बहरून जाते. या दोघींनीही त्या फुलांच्या नाना तर्‍हेच्या माळा करून त्या केसात आणि अंगभर माळलेल्या होत्या. त्यावर्षी नाचासाठी सुग्गी म्हणजे दिवा ठेवलेली बांबूची टोपली घ्यायचा मान त्या दोघींनाही मिळालेला होता.

- Advertisement -

ती सुग्गी टोपली झाकण्यासाठी बाजारातून त्यांनी लाल कापड आणले होते. इंद्राने त्यावर पांढर्‍या जाड दोरव्याने भरतकाम केले होते. इंद्राचे भरतकाम सुंदर होते. भरतकामात आरसे, रंगीत मणी आणि मोती वापरी. एखाद्या चित्राचे रेखाटन करावे तसे ती भराभर भरतकाम करायची की पाहणारे अचंबितच होत असत. तिची बहीण चंद्राही अतिशय गुणी मुलगी होती. ती लवलव करत घरातली कामे, कासूसाठी औषधे कुटणे, धानाचे रान शिंपणे, जंगलात जाऊन औषधी गोळा करणे अशी सगळी कामे भराभरा करत असे. स्वयंपाकही ती अतिशय उत्तम करी. तिने रांधलेला चारोळ्या घातलेला रानमुगाचा लचका एकदा खाल्ला की त्याची चव विसरणे कोणालाही अशक्यच होते.

या दोघींचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांना बापासारखाच निसर्ग वाचनाचा आणि नवी नवी औषधे शोधण्याचा ध्यास होता. जंगलात त्या तासन्तास रमत. नवी रहस्ये समजून घेत, पण त्या बायका असल्याने वैद्यकी करायला आणि निसर्ग समजून घ्यायलाही त्यांना मर्यादा होत्या. त्यांना धानाच्या शेतात राबावेच लागे. शिवाय घरकामातूनही त्यांची सुटका नव्हती. चंद्रा तर बांबूच्या पट्ट्या काढून त्याच्या सुरेख टोपल्याही विणत असे. त्या दिवशीच्या सुआ नृत्यातल्या सुग्गीसाठी, बांबूची मोठी टोपली चंद्रानेच विणलेली होती. इंद्राने ती टोपली आणि त्यात लावायचा मातीचा दिवा अगोदरच रंगवून ठेवला होता. त्या दिवशी दुपारी फुलांच्या माळांनी टोपली सजवली होती. त्या दोघीही सुआ नृत्यात अगदी प्रवीण होत्या. सुआ नृत्य म्हणजे ‘पोपट नृत्य.’ त्यासाठी गोंड बायका मातीचा सुआ तयार करतात. मातीचा सुआ तयार करण्याचा मान गावाच्या मुखियाच्या बायकोचा. ती नसली तर तो मान तिच्या बहिणीचा असतो. मातीचा सुआ पानांच्या हिरव्या रंगात रंगवून फुलांच्या लाल रंगांनी त्याची चोच रंगवतात. निळ्या गोकर्णीच्या फुलांनी त्याची कंठरेघ रंगवतात. रंगवलेला सुआ पेरूच्या झाडावर ठेवलेला असतो.

- Advertisement -

वस्तीतल्या सर्व बायका सुआला नाचासाठी येण्याची विनंती करतात आणि त्याला माळा चढवतात. मग सजवलेला सुआ आणि मातीचा दिवा फुलांच्या माळांनी सजवलेल्या बांबूच्या टोपलीत ठेवून त्यांची मिरवणूक काढतात. संध्याकाळ सरत आली की सुग्गी मध्यभागी ठेवून गोंड स्त्रिया आणि मुली त्याच्या भोवताली वर्तुळाकार नाच करतात. त्यावेळी गाणे म्हणत त्यांच्या प्रियकराला देण्यासाठी काव्यमय आणि कूटभाषेत मातीच्या पोपटाकडे त्या निरोप देतात. कूटभाषा आणि कूटप्रश्न हा गोंडांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सुआ नृत्य करताना बायका पोपटासारख्या माना हलवतात आणि तसेच मिठूसारखे आवाज काढतात. हे नृत्य हातात दांडिया घेऊनही किंवा टाळ्या देऊन करतात. त्यावेळी कधी कोणी त्यावेळी ढोलकीही वाजवत असते. दरवर्षी दिवाळीनंतर ते डिसेंबरअखेरपर्यंत सुआ नृत्य जवळपास रोज संध्याकाळी सुरू होते आणि मध्यरात्री चंद्र डोक्यावर आला की संपते.

सुग्गीतला दिवा जर सकाळपर्यंत तसाच तेवत राहिला तर पहाटे पहाटे खरोखरचे पोपट येतात. पोपट आले की सर्व गोंड स्त्रिया घरातून बाहेर पडतात आणि पोपटांना डाळ, मिरची, पेरू ठेवतात आणि शेवटचा फेर धरतात. त्यावेळी गायलेले गाणे त्या बायकांबरोबर पोपटही गातात आणि मग त्या वर्षीच्या नृत्य समारोहाची सांगता होते.

इंद्रा आणि चंद्रा दरवर्षी सुआ नृत्यासाठी वेगवेगळी गाणी रचत असत आणि अवघड अवघड पदन्यास शोधत. इतक्या गुणी मुली, पण त्या जन्मल्यापासूनच त्यांच्या खर्‍या आईबापांचा पत्ता नव्हता. साधारण १५ वर्षांपूर्वी पेरसा पेन देवाच्या झाडाखाली एका टोपलीत, मोहाच्या पानांच्या गादीवर उंची आणि मऊ मऊ कापडांवर दोन अगदी तान्ह्या म्हणजे १०- १२ दिवसांच्या मुली कुणीतरी ठेवून गेले होते. बाळांच्या अंगावरचे कपडेही भारीच होते. शेजारी सोन्याचे डूल, चांदीचे वाळे आणि करदोडे बांधलेली पुरचुंडी ठेवलेली होती. भीमा कासू गोंड रोजच्याप्रमाणे सकाळी देवाचे दर्शन घ्यायला गेला तेव्हा त्याला ती टोपली दिसली. त्या मुली वस्तीतल्या कुणा बाईकडे सांभाळायला द्याव्यात या हेतूने ती टोपली उचलून तो घरी परतला.

भीमा कासूला काही स्वत:चा संसार नव्हता, पण त्याची झोपडी मोठी होती. एकटा असला तरी भीमा कासूला स्वतःला रांधावे लागत नसे. हररोज कोणी गोंडीण त्याच्यासाठी धानाची पेज आणी तर कुणी त्याच्या दारासमोर रांगोळी रेखी. रोज संध्याकाळी भीमा कासू जंगलात गोळा केलेली फळे खाई. अगदी तरुण वयापासून त्याचा हाच दिनक्रम होता. पेरसा पेन या देवानेच त्याला शपथ घालून स्त्रियांपासून दूर राहायला सांगितले होते. त्या बदल्यात त्याला औषधांचे आणि निसर्गाचे ज्ञान दिले होते. त्यामुळे भीमा कासू हा तिथला वैद्य आणि जाणकार होता. म्हणजे तो भविष्य वगैरे सांगे. त्याला प्राणी, पक्षी यांच्या हालचाली, त्यांचे झाडाझुडुपांशी असलेले संबंध तसेच झाडांना येणारे फुलोरे याचे ज्ञान होते. त्यावरून तो धानाची पेरणी कधी करायची, जंगलात कधी जायचे, पिकांवर कीड पडेल का कसे इत्यादींबाबत मार्गदर्शन करत असे. सापाचा आणि विंचवाचा डंख उतरवण्याचेही त्याचे कसब अजब होते. त्यासाठी त्याला लांबूनही लोक बोलवत. बदल्यात सोन्याचांदीच्या वस्तू देत, पण कासू भीमा चुकूनही त्या वस्तूंना हात लावत नसे. त्याच्याबद्दल तिथल्या लोकांच्या मनात अगदी भक्तिभावच होता.

तो भीमा कासू जेव्हा त्या मुलींची टोपली घेऊन वस्तीत आला तेव्हा त्याला काहीही न विचारता त्या बाळांचे सर्व वस्तीने स्वागत केले. वस्तीतल्या बायांनी त्या टोपल्यातील मुलींसाठी पाळणा बांधला. त्यांना दूध दिले, पण मग त्या मुलींबद्दल विचारविनिमय करण्यासाठी त्या संध्याकाळी पंचांची बैठक बसली. तेव्हा सर्वानुमते वस्तीतल्या बाया बापड्यांच्या मदतीने भीमा कासूने मुलींना सांभाळावे असे ठरले. भीमा कासूही हळूहळू म्हातारा होणार होता. अजूनपर्यंत त्याच्या घरी ना कधी कुठल्या बाईचे चाळ वाजले, ना कधी कुठल्या पोरांची कलकल.

पेरसा पेन देवानेच भीमा कासूला त्याच्या कठोर सेवेबद्दल त्या छोट्या मुली बक्षीस म्हणून दिल्या आहेत अशी वस्तीतल्या सर्वांची ठाम श्रद्धा होती. भीमा कासूनेही त्या मुलींना आनंदाने स्वीकारले. त्या मुली म्हणजेच ‘इंद्रा आणि चंद्रा.’ त्या दोघीच आपसात खेळत. वस्तीवरच्या कोणाही मुलामुलींशी त्या बोलतसुद्धा नसत. भीमा कासूला भारी चिंता वाटे. त्याच्या प्राक्तनात जोडीदाराचे सुख नव्हते, पण या पोरींच्या नशिबात ते असले पाहिजे असे त्याला मनापासून वाटे, पण त्या पोरींना जंगलात राहणार्‍या इतर जमाती म्हणजे माडिया गोंड, पारधी, धीवर यांच्यातलीसुद्धा कुणीही मुले आवडत नसत. इंद्रा म्हणे तिचा पती इंद्रदेव म्हणजे दुल्हादेव हार्दूल, तर चंद्रा म्हणे तिचा पती चंद्रदेव, त्याशिवाय दुसरे कुणीही नाही.

दरवर्षी सुआ नृत्याच्या वेळी दोघीही नित्यनेमाने हार्दूल आणि चंद्रदेवासाठीच विरहगीते गात. सुरुवातीला सर्वांना मजा वाटे, पण त्यावर्षी दोघी १५ वर्षांच्या झाल्या होत्या. त्यांच्या बरोबरीच्या सर्वांना जोडीदार मिळालेले होते. वरच्या जंगलातल्या नायकाची मुले बोंडी आणि भुल्या, त्या दोघींवर जीव टाकत. तीही मुले गुणी होती, पण या दोघी त्यांच्याकडे पाहतही नसत. खालच्या जंगलातही खूप तरुण मुले होती, शिवाय त्या दोघींच्या सौंदर्याची आणि गुणांची कीर्ती दूरवर पसरल्यामुळे लांबवरचीसुद्धा तरुण मुले सवड मिळाली की भीमा कासूच्या दारापाशी रानजाईचे गजरे ठेवून जात, पण या पोरी काही कधी ते गजरे उचलत नसत.

त्या रात्री तर त्या दोघी नक्षत्रासारख्या सुंदर दिसत होत्या. त्यांच्याकडे पाहता पाहता भीमा कासूचे म्हातारे डोळे भरून आले. त्या दोघीही त्यांच्या बावाजीला नमस्कार करून डोक्यावर टोपल्या घेऊन घराबाहेर पडल्या तर काय आश्चर्य… प्रत्यक्ष चंद्रदेव आकाशातून चंद्रा पोरीकडे पाहता पाहता पुढे जायचे विसरला. पुढे तो ढगांवरून निंबाच्या झाडावर आणि तिथून अलगद जमिनीवर उतरला. चंद्राचा हात हातात घेऊन चंद्रदेव पेरसा पेनकडे निघाला. पेरसा पेनने जोडीला कौल दिला की बाकी कुणाला काही म्हणता यायचे नाही. चंद्रदेवाचे ते लखलखीत सौंदर्य आणि त्याच्या मागे निघालेली विलक्षण देखणी चंद्रा पाहून सगळे अवाक् झाले होते. पुराण्या जमान्यात चंद्रदेव पृथ्वीवर येई असे सगळ्यांनाच माहीत होते, पण अलीकडच्या काळात असे काही होईल असे कोणाच्या स्वप्नातही आले नव्हते.

नव्या जोडीने पेरसा पेनचा आशीर्वाद घेऊन मग आईवडिलांचा आणि वस्तीवरच्या थोरामोठांचा आशीर्वाद घ्यायचा अशी तिथे पद्धत होती, पण ‘चंद्रा आणि चंद्रदेव’ ही जोडी काही पेरसा पेनचा कौल घेऊन परतली नाहीत. ते आपले तिथूनच चांदण्यांच्या राज्यात निघून गेले असावेत असे लोकांना वाटले. मग त्या दिवशीच्या सुआ नृत्यात इंद्रा एकटीच नाचत राहिली. तिच्या बहिणीच्या वियोगाची कहाणी सुआला सांगत राहिली. मध्यरात्री जेव्हा तिची पावले थकली होती. बहिणीच्या वियोगाने रडून रडून तिच्या गळ्याला शोष पडला होता, त्याचवेळी तिथे चक्क दुल्हादेव हार्दूलही आला. त्याने इंद्राचा हात मागितला. इंद्राने हलकेच हसून डोळे पुसले आणि तिही दुल्ह्यादेवाच्या मागोमाग पेरसा पेनकडे निघाली.

इकडे मातीचा सुआ म्हणजे पोपट जिवंत होऊन महादेव गौराच्या काळातही एकदा असंच झालं होतं असं सांगू लागला, पण पुढे कोणालाही नृत्य करावेसे वाटेना. सुग्गीतला दिवा तेवत राहिला, पण नृत्य थांबले. असं कधी झालं नव्हतं. बायका तर सुआजवळच बसून राहिल्या. हळूहळू वस्तीतले सर्व पुरुषही तिथे आले. सर्वांनी मिळून बडा महादेव आणि गौराची पुष्कळ स्तुती केली. शेवटी सुआ म्हणायला लागला की, भीमा कासू, तुझ्या पोरींना जोडीदारांची गरज नाही. त्या तुझ्यासारखी औषधे सांगून समाजाचे भले करतील. त्या निसर्गाचे भान ठेवतील. तू दोघी मुलींसाठी पेरसा पेनकडून शपथ घे. सुआची वाणी ऐकून सगळं गाव अचंबित झालं. जोडीदाराशिवायची बाई असं कधी कुणी ऐकलंही नव्हतं, पहायचं तर दूरच. शिवाय त्या दोघींना नुकतेच थेट स्वर्गातलेच जोडीदार मिळालेले सर्वांनीच पाहिले होते. भीमा कासूने सुआसमोर साष्टांग दंडवत घातला. तत्क्षणी सुआ बोलायचा बंद झाला आणि समोरच्या शेवरीच्या झाडावर बसलेले सगळे पोपट उडून गेले. रात्रभर कोणाला काहीच सुचत नव्हते.

शेवटी सूर्यदेव उगवला, पण त्या दिवशी त्याला नमस्कार करायचेही कोणाला सुचेना. सर्वात अगोदर भीमा कासूच भानावर आला. सूर्यदेवाचा कोप येऊ नये म्हणून भीमा कासूने देवाला सगळी हकीकत कथन केली. सूर्यदेव हसून म्हणाले, कुठे गेल्यात लेकी? कुणी नेल्यात लेकी? त्या पाहा नदीवरून घेऊन आल्या त्या पाण्याची मडकी, मग सूर्यदेवाने भीमा कासूला समजावले. चंद्रा आणि इंद्रासाठी जोडीदार पाहायचे काही कारण नाही. पेरसा पेेनकडे भाकणूक मागून मुलींना औषधे द्यायची परवानगी द्या.

त्यानंतर खरोखरंच वस्तीतल्या सर्वांना त्या दोघीही पाण्याची मडकी घेऊन नदीवरून येताना दिसल्या. मग ते पाणी त्यांनी पेरसा पेनवर ओतून पाच झाडांच्या फांद्या, पाच झाडांची मुळे आणि पाच गवताच्या काड्या ठेवून देवाची यथासांग पूजा केली. त्या दिवशी पेरसा पेनने दोघींनाही जोडीदाराशिवाय राहून वैद्यकी करायची परवानगी दिलीच, पण तिथल्या समस्त बाया माणसांनाही आयुष्यभर जोडीदाराशिवाय राहून वेगळे काही करायचे असेल तरी हरकत नसल्याचे सांगितले. आजही अनेक आदिवासी गोंड स्त्रिया त्यांच्या इच्छेनुसार जोडीदाराशिवाय राहून आयुष्यभर त्यांच्या आवडीच्या विषयाला वाहून घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -