घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस अकादमीसाठी १० कोटी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीस अकादमीसाठी १० कोटी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

Subscribe

पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळयात ग्वाही

नाशिक : राज्यभरातील पोलिसांना ट्रेनिंग देणार्‍या नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीस अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी ट्रेनिंग सेंटर इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्वाही दिली. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकार्‍यांना अत्याधुनिक सुविधा मिळण्यासठी ट्रेनिंग सेंटरची गरज आहे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली होती.

पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा रविवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता मुख्य कवायत मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी ३२२ पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले. या सोहळ्याला पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, मान्यवर आणि नातलग उपस्थित होते.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तरुणाचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. एमपीएससीमार्फत पोलीस अधिकार्‍यांची निवड केली जाते. ही निवड प्रक्रिया पारदर्शी आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकार्‍यांनी कर्तव्य व नियमांचे पालन करावे. प्रशिक्षणार्थी पोलिसांनी संवेदनशील व माणसुकीच्या भावनेतून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. आपल्या कामगिरीने पोलीस दलाचा गौरव वाढवा. प्रशिक्षणार्थींनी भ्रष्टाचार व लाचप्रकरणापासून दूर रहावे. आपली बांधिलकी राज्यघटनेशी आहे, हे कायम स्मरणात ठेवा. राजकीय दबावाला कधीही बळी पडू नका. जे योग्य वाटते तेच करा.

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी १० महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल होत आहेत. प्रशिक्षणार्थींनी पोलीस गणवेशाची प्रतिष्ठा सर्वोच्च ठेवावी. कोणत्याही आमिषांना बळी पडू नये. समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येकांने स्वत:ला अपडेट ठेवावे. पोलीस दलात कालबद्धतेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस शिपाई निवृत्तीवेळी पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. पोलीस अधिकार्‍यांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे.

- Advertisement -

राज्यातील ८७ पोलीस ठाण्यांची होणार दुरुस्ती
पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती केली जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ८७ पोलीस ठाण्यांच्या इमारतींची दुरुस्ती केली जाणार आहे. राज्यातील पोलिसांसाठी टप्प्या-टप्प्याने एक लाखांपर्यंत घरे बांधली जाणार आहेत. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ७३७ कोटी रुपयांची तरतूद केली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात ८०२ कोटी रुपये व इतर खर्चांसाठी १ हजार २९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -