घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थ्यांऐवजी ठेकेदाराच्या घशात ३०० पोती पोषण आहाराचे तांदूळ

विद्यार्थ्यांऐवजी ठेकेदाराच्या घशात ३०० पोती पोषण आहाराचे तांदूळ

Subscribe

गुदामाच्या शेजारील बंगल्यात आढळली पोती; महिला बचतगटाकडून पर्दाफाश

नाशिक : महापालिका तसेच खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार पुरवल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी सेंट्रल किचन योजनेच्या तेरा ठेकेदारांना अपात्र केल्यानंतर आता एका ठेकेदाराच्या हिरावाडी येथील ठाकरे मळा परिसरातील गुदाम तपासणीत शेजारील बंगल्यात तब्बल तीनशेहून अधिक शासनामार्फत पुरवलेली तांदळाची पोती सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार याच वादग्रस्त ठेकेदारांचे २ कोटी ६९ लाख ३० हजार रुपयांचे देयक (बिल) काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पथक तपासणीसाठी आले असताना नाशिकमधील जागरूक महिला बचत गटाच्या पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांच्या पोटात जाण्याऐवजी गुदामात तांदळाची पोती कशी सडवली, याचा धक्कादायक पर्दाफाश केला.

- Advertisement -

दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय पदाधिकार्‍यांनी दबाव टाकल्यानंतरही शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी तत्परता दाखवून व प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेत रात्री उशिरापर्यंत थांबून संबंधित तांदळाची पोती, त्याची स्थिती तसेच महापालिकेकडे संबंधित ठेकेदाराने तांदूळ वापराबाबत दिलेला ताळमेळ याचा अहवाल तयार करून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे अहवाल पाठवला जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे.

या प्रकरणाशी आपला काहाही संबंध नाही. चुकीच्या पद्धतीने शासनाचे तांदूळ जर दडवले गेले असतील व विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असेल तर स्वत: पत्र देवून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करेल.
– हिरामण खोसकर, आमदार 

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे अहवालही सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यात काही गडबड होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल. – कैलास जाधव, आयुक्त महापालिका

स्वामी विवेकानंद सामाजिक शैक्षणिक सेवा संस्था यांच्या गुदामालगत बंगल्यात पोषण आहारातील तांदळाची पोती महिला बचतगटांना सापडली. पंचनामा केला असून संबंधित ठेकेदाराने ही तांदळाची पोती आपली असल्याची कबुली दिली आहे. – सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -