घरमहाराष्ट्रनाशिकडेंग्यू, चिकुन गुनियापुढे प्रशासन हतबल

डेंग्यू, चिकुन गुनियापुढे प्रशासन हतबल

Subscribe

सप्टेंबर महिना पुन्हा एकदा नाशिककरांच्या आरोग्यासाठी घातक

गेल्या महिन्यापासून डेंग्यू आणि चिकुन गुनियाचा उद्रेक झाला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र या आजारावर नियंत्रण आणण्यात अपयश येत असल्याचे दिसते. नाशिकमध्ये सध्या सातशेहून अधिक चिकुन गुनियाचे रुग्ण आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देखील चिकुन गुनियाची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीलाही ते नव्हते.

या बैठकीत पालकमंत्र्यानी शहरात डास निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नाशिककरांसाठी सप्टेंबर महिना पुन्हा एकदा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा कहर होता. आता या वर्षी डेंग्यू आणि चिकुन गुनियाने नागरिक त्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या १४ तारखेपर्यंत शहरात डेंग्यूचे १४० नवे रुग्ण सापडले आहेत, तर चिकुन गुनियाचे ९५ नवे रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात ३११ डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर चिकुन गुनियाचे २१० रुग्ण सापडले होते. नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी भुरभुर पाऊस सुरू असतो. तर कधी सरीवर सरी बरसत असतात.

- Advertisement -

रुग्णसंख्या वाढता वाढता वाढे

नाशिकमध्ये २०१७ मध्ये डेंग्यूचे १५१ रुग्ण होते, तर चिकुन गुनियाचे ४ रुग्ण होते. २०१८ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा ३६८ वर गेला होता, तर चिकुन गुनियाचे ४० रुग्ण सापडले होते.२०१९ मध्ये डेंग्यूचे रुग्ण १७७ होते. या वर्षी चिकुन गुनियाच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त एक रुग्ण सापडला होता. २०२० मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ११५ होती, तर चिकुन गुनियाच्या रुग्णांची संख्या सात होती. मात्र २०२१ मध्ये डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते.

वॉर्डनिहाय फवारणीची मागणी

सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बर्‍याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चर्चाच सुरू आहे. मात्र, सध्या तरी नाशिककरांना डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीने हैराण केल्याचे दिसत आहे. महापालिकेने वॉर्डनिहाय फवारणी करावी, डासांच्या उत्पत्ती ठिकाणांवर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -