औषध खरेदीत प्रशासनाची मनमानी

भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांचा आरोप

medicines
प्रातिनिधिक फोटो

नाशिक ; तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर औषध खरेदीसाठी जिल्हा परिषद स्थायी व सर्वसाधारण सभेत ठराव झालेला असताना त्याला केराची टोपली दाखवत प्रशासनाकडून मनमानी पध्दतीने औषध खरेदी केली जात असल्याचा आरोप भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या ठरावांनुसार औषध खरेदीची मागणी डॉ. कुंभार्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे केली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार कार्यवाही न करता मनमानी करून जी.एम.पोर्टलवर औषध व साहित्य खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा अवमान करणारी आहे. तसेच कोरोनाची बरीच औषधे व साहित्य काही ठरावीक कंपन्यांनी प्री-बीड घेतलेले आहे. त्यामुळे ठरावीक कंपन्यांनाचा औषधे व साहित्य पुरवठ्याचा आदेश मिळण्याची शक्यता आहे.

तसेच पुरेशा प्रमाणात स्पर्धा होणार नाही व नवीन पुरवठादारांना संधी मिळणार नाही, अन त्यातील बरीच औषधे ही शासन निर्णयानुसार शासकीय संस्था बाजार मुल्याप्रमाणे उपलब्ध करुन देऊ शकतात.त्यामुळे शासनांचा अप्रत्यक्ष फायदा होणार आहे. त्यामुळे जी.एम. पोर्टलवर औषध व साहित्य खरेदी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. ती तात्काळ रद्द करण्यात यावी. प्रक्रीया ही शासन धोरणाच्या विरोधात असल्याने व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा अवमान करणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Dr Atmaram Kumbhardeऔषध खरेदीची फाईल एका दिवसात निकाली काढली जाते. ठराविक कर्मचारी वर्षोनुवर्ष एकाच टेबलावर बसून ही औषध खरेदी करतात. आतापर्यंत झालेल्या औषध खरेदीची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.
                      – डॉ. आत्माराम कुंभार्डे, गटनेता, भाजप जि. प.