कैद्यांना मदत; दोन तुरुंगाधिकार्‍यांना अटक

नाशिकरोड : येथील मध्यवर्ती कारागृहात कारागृह रजिस्टरमध्ये खाडाखोड करत कैद्यांना विविध प्रकारे मदत मिळवून देण्याच्या कारणास्तव दोषी आढळलेल्या दोन तुरुंगाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिसरा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नांदेड कारागृहाचे तुरुंगाधिकारी एस. ए. गिते व नांदेड कारागृहाचे तुरुंग अधिकारी माधव खैरगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डाबेराव (जालना कारागृह) असे फराफ संशयिताचे नाव आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना न्यायाधीन कालावधीत वाढ करणे, बाह्य कालावधी दिवस कमी करणे आदी प्रकारे लाभ दिल्याच्या प्रकरणात गेल्या पाच वर्षापासून चौकशी सुरु होती. यात दोन तुरुंगाधिकारी व एक वरिष्ठ लिपिक हे दोषी सापडल्याने त्यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात एप्रिल २०२२ महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील निलंबित करण्यात आले होते. अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामिन मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, जामीन न मिळाल्याने नांदेड कारागृहाचे तुरुंगाधिकारी गिते व नांदेड कारागृहाचे तुरुंग अधिकारी खैरगे यांनी शनिवारी (दि.२४) अखेर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. नाशिकरोड पोलिसांनी त्यांना अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरेश डाबेराव यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुंतोडे करत आहेत.