घरमहाराष्ट्रनाशिकघातक ‘बायोमेडिकल वेस्ट’ घंटागाडीत

घातक ‘बायोमेडिकल वेस्ट’ घंटागाडीत

Subscribe

वणी : संसर्ग काळातही अक्षम्य दुर्लक्ष; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

शहरातील बायोमेडिकल कचरा थेट घंटागाडीत टाकला जात असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी व शहरातील नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत महामारीच्या संकटात कोरोना संसर्गाचा मोठा धोका असतानाही खासगी दवाखाने, रुग्णालये बायोमेडिकल वेस्टेज राजरोसपणे थेट घंटागाडीत टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हीच घंटागाडी गावातून फिरत डंपिंग ग्राऊंडवर हा सर्व कचरा उघड्यावरच टाकत असल्याने रुग्णांसाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन्स, सलाईनच्या नळ्या, बाटल्या, हातमोजे, औषधांच्या बाटल्या हे सर्व वेस्टेज नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचवण्यास कारणीभूत ठरत असल्याचा धोका जागरूक नागरिकांकडून बोलून दाखवला जात आहे.

या गंभीर प्रकाराबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात वणीतील निरामय हॉस्पिटल खासगी कोविड सेंटरचा बायोमेडिकल वेस्टेज थेट घंटागाडीत टाकला गेल्याचे ग्रामस्थांच्याच निदर्शनास आले. या कचर्‍यात कोविड सेंटरमध्ये वापरण्यात आलेले हातमोजे, सलाईनच्या बाटल्या, वापरलेले इंन्जेक्शन उघड्यावर टाकण्यात आले होते. ग्रामस्थांनी त्यावर अक्षेप घेत हा आरोग्यास धोका पोहोचवणारा कचरा तेथून काढून स्वतंत्र विल्हेवाट लावण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला. त्यावेळी संबंधीत खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी विरोध केला. ‘आम्ही सरकारला पैसे भरतो, या कोविड सेंटरमध्ये तीसच्या आसपास कोविडबाधीत रुग्ण होते, त्यांचा हा कचरा असून, तो नेलाच पाहिजे’ असे म्हणत त्यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवर दबाव आणला. यावेळी प्रभारी ग्रामविकास अधिकार्‍यांनी या कचर्‍याला विरोध करत कचरा काढून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत सूचवले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने घंटागाडीतील मेडिकल वेस्टेज काढले नाही. उलट ‘तुम्हीच त्याची विल्हेवाट लावा, काय खर्च होईल तो देऊ’ असे सांगून या सर्वांना न जुमानता काढता पाय घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराचीची गांभीर्याने दखल घेत कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु प्रकार उलटाच घडला. बायोमेडिकल कचरा डंपींग ग्राऊंडवरच नेऊन टाकण्यात आला. यामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

कोविड सेंटरमधील कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रकार नित्याचे झाले असून, या प्रकाराला आठवड्याचा कालावधी उलटूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दि.३० मे रोजी घंटागाडीत सलाईनच्या बाटल्या, वापरलेली इन्जेक्शन्स दिसून आले. संतप्त नागरिकांनी अखेर या प्रकाराचे फोटो काढून समाजमाध्यमांतून दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे येथील वैद्यकीय अधिकारी यांच्यापर्यंत ती पोहोचवली. आता ते या गंभीर प्रकाराकडे किती गांभीर्याने पाहतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. घंटागाडीवरील कर्मचार्‍यांवर दबाव आणून मेडिकल वेस्टेज टाकले जाते, हा प्रकार आरोग्यास बाधा पोहोचवणारच नसून नियमबाह्य देखील असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -