घरमहाराष्ट्रनाशिकबाळाचा जीव वाचवण्याची मातेची धडपड अखेर निष्फळ; वैद्यकीय अधिकाऱ्यांची हलगर्जी

बाळाचा जीव वाचवण्याची मातेची धडपड अखेर निष्फळ; वैद्यकीय अधिकाऱ्यांची हलगर्जी

Subscribe

बाळाच्या कुटुंबीयांचा आरोप; अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने भरपावसात दुचाकीवरुन गाठले सटाणा रुग्णालय

सटाणा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे वनोली (ता. बागलाण) येथील पाच दिवसांच्या बाळाला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढी गंभीर घटना घडूनही ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने बाळाच्या मृत्यूची दप्तरी नोंद करण्याची माणुसकीदेखील दाखवली नाही. परिणामी आरोग्य यंत्रणेविषयी तालुकावासियांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने, संताप व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, बाळाच्या मृत्यूस कारणीभूत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वनोली (ता. बागलाण) येथील मंदा पिंपळसे या महिलेची २६ जुलैला प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला होता. साजन सोनवणे (५ दिवस) हे नवजात बालक स्तनपान करत नसल्याने कुटुंबियांनी ३० जुलैला सकाळी ९ वाजता ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी धाव घेतली. मात्र, दोन ते तीन तास थांबूनही आरोग्य केंद्रात नियुक्त वैद्यकीय अधिकारी न आल्याने, परिचारिकेने स्वतःच्या हस्ताक्षराने रुग्णाचे संदर्भसेवा पत्र भरून पालकांच्या हातात दिले. शासनाच्या नियमानुसार ताहाराबाद येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने बाळावर तत्काळ उपचार करणे आवश्यक होते. मात्र वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात आले नसल्याने बाळाला पुढील उपचारांसाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासनाच्या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा देणे नियमाने बंधनकारक होते. परंतु, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारामुळे मंदा पिंपळसे आणि त्यांच्या बाळाला भर पावसात दुचाकीवरून सटाणा येथे न्यावे लागले. त्यानंतरही माता आणि बाळाला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. येथे नियुक्त वैद्यकीय अधिकार्‍याने वरवर तपासणी करत एक औषध लिहून देत माता व बाळाला घरी पाठविले. घरी नेल्यानंतर बाळाची प्रकृती अधिकच बिघडली. उपचारासाठी नातेवाईकांनी पुन्हा भर पावसात वनोलीहून बाळाला दुचाकीवर ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. उपचाराअभावी बाळ दगावल्याने संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकार्‍याने योग्य उपचार न केल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍याने गरीब आदिवासींना बळाचा वापर करून रुग्णालयाबाहेर काढले.

- Advertisement -

वैद्यकीय अधिकारी चार-चार दिवस गैरहजर

तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून सक्षम अधिकारी नियुक्ती करणे बंधनकारक आहे. मात्र, या जबाबदार पदावर कळवण तालुक्याच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू केल्याचे बोलले जात आहे. सक्षम अधिकारी नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी चार चार दिवस गैरहजर असतात. त्यामुळे उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या दोन आदिवासी महिलांचा मृत्यू झाला आहे. संबंधित विभागाने या अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.

१७ वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकाची प्रतीक्षा

येथील ग्रामीण रुग्णालयाला गेल्या १७ वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक लाभलेला नाही. त्या पदाला पात्र नसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार दिला जातो. सक्षम अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातून उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या गंभीर प्रकाराबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याबाबत अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता डॉ. बांगर आठवड्यातून केवळ दोन दिवस येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला.

- Advertisement -

रुग्णालयाचा दोष नाही

सटाणा ग्रामीण रुग्णालयात पालकांनी बाळाला दाखल केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले. मात्र घरी गेल्यानंतर उलटीचा त्रास होऊन नाका तोंडात उलटीचे द्रावण गेल्याने त्याची प्रकृती खालावली असावी. आम्ही बाळावर प्रामाणिकपणे आवश्यक ते सर्व उपचार करूनही बाळ दगावले. यात सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा कोणताही दोष नाही. – डॉ. एन. एस. बांगर, वैद्यकीय अधीक्षक, सटाणा ग्रामीण रुग्णालय

तातडीने चौकशी केली जाईल

ही घटना अतिशय गंभीर आहे. बालमृत्यू, कुपोषण रोखण्यासाठी शासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. गर्भवती महिला अथवा प्रसूत माता आणि बाळ यांना आरोग्य सुविधा पुरवणे शासन नियमानुसार आवश्यक आहे. ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. – जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार, बागलाण

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र व सटाणा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे आमचे बाळ दगावले आहे. वेळेवर उपचार व सुविधा मिळाली असती तर बाळ हयात असते. शासनाने दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. – अभिमन शिवदास पिंपळसे, पालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -